Sunday, May 3, 2026
Latest NewsPUNE

सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत – मंदार लवाटे

पुणे : सवाई माधवराव यांचा जन्म १८ एप्रिल १७७४ रोजी झाला. सवाई माधवराव यांच्या  जन्मापूर्वीच ‘माधवराव’  हे नाव निश्चित करण्यात आले होते. थोरले माधवराव यांच्या निधनानंतर  त्यांच्या पिंडीला कावळा शिवला नाही. तेव्हा असे सांगितले गेले की मला  मुलगा होईल तेव्हा त्याचे नाव माधवराव ठेवीन. तेव्हा  पिंडाला कावळा शिवला. अशा नोंदी आहेत आणि त्यामुळे नारायणरावाच्या मुलाचे नाव परत माधवराव ठेवले गेले आणि ते सवाई माधवराव म्हणून ओळखले गेले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मुंज पर्वती टेकडी येथे पार पडली आणि त्यांचे लग्नही याच ठिकाणी झाले. जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशीच त्यांना पेशवेपद मिळाले ही इतिहासातील दुर्मिळ घटना आहे.  सवाई माधवरावांचे नशीब एका बाजूने अत्यंत मोठे वाटते, जणू कोणालाही न लाभलेला अधिकारयोग त्यांच्या भाग्यात होता; पण त्याच वेळी काही प्रसंग अत्यंत दुर्दैवीही ठरले. अशी माहिती इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिली.

श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री सिद्धिविनायक सारसबाग मंदिराच्या २४२ व्या वर्धापनदिनानिमित्त इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांचे श्रीमंत सवाई माधवराव पेशवे या विषयावर व्याख्यान झाले. सारसबाग गणपती मंदिराच्या प्रांगणात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत यावेळी उपस्थित होते.

मंदार लवाटे म्हणाले, सवाई माधवरावांच्या जन्मासाठी केलेले नवस पूर्ण करण्यासाठी नाना फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. या नवसफेडीसाठी त्या काळात सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा खर्च झाला होता. शनिवारवाड्यात आगमनावेळी सवाई माधवरावांवर सोन्याची फुले उधळण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

ते पुढे म्हणाले, नाना फडणवीसांना कल्पना होती की सवाई माधवरावांना सुद्धा मारण्याचे प्रयत्न केले जाणार, आणि ते त्यांच्या लहानपणापासूनच सुरू होते. पुरुषोत्तम दाजी हे त्यांच्या पायरीवर झोपायचे. एकदा एक बाईने केसांच्या बुचड्यात सुरी लपवली होती. मात्र तिला पकडण्यात आले. पटवर्धनांना या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना होती. पुढेही असे अनेक प्रयत्न होत राहिले, याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. नाना फडणवीसांनी सवाई माधवरावांच्या भोवती त्रिस्तरीय (तीन घडींची) सुरक्षा व्यवस्था केली होती. त्या आतल्या कड्यात बळवंतराव नागनाथ नावाचा माणूस होता. हे सगळे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. इ.स. १७९४ मध्ये सवाई माधवरावांचा मृत्यू झाला. अनेकांना अशी आशा होती की ते आपल्या पूर्वजांसारखे महान शासक होतील.

इ.स. १७८२ साली सारसबाग मंदिर बांधणीला सुरुवात झाली. प्रारंभी गणपतीची मूर्ती कुरुंदा दगडाची होती, असा समज प्रचलित होता; मात्र नव्या नोंदींनुसार पहिली मूर्ती संगमरवरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढे कालांतराने मूर्ती बदलण्यात आल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. त्या काळात सारसबाग परिसर हा गावाबाहेरचा भाग असतानाही गणपतीची अत्यंत निगुतीने व भक्तिभावाने पूजा केली जात होती. पेशवे घराण्याचे आराध्य दैवत गणपती असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व होते.

रमेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. पुष्कर पेशवा यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ लडकत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading