Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

३ ते ५ एप्रिल दरम्यान संपन्न होणार २८ वा कलाश्री संगीत महोत्सव

 

पुणे  : गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा कलाश्री संगीत महोत्सव यावर्षी शुक्रवार ३ ते रविवार ५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण यांनी केली. महोत्सवाचे हे २८ वर्ष असून तीनही दिवस सायं ४.३० वाजल्यापासून पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे तो संपन्न होईल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी आगावू नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.

महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना पं. सुधाकर चव्हाण पुढे म्हणाले की, ज्येष्ठ कलाकारांसोबतच आश्वासक युवा कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ गेली २७ वर्ष कलाश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करीत असून सदर वर्ष हे महोत्सवाचे २८ वे वर्ष आहे याचा आम्हाला अभिमान आहे. या निमित्ताने विविध कलाकारांची कला या भागातील नागरिक अनुभवतील आणि त्याचा मनमुराद आनंद लुटतील असा आमचा विश्वास आहे.

शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सायं ४.३० वाजता चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी आमदार अश्विनी जगताप, आमदार तानाजी सावंत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक अप्पा रेणुसे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांचीही विशेष उपस्थिती असेल, अशी माहितीही पं. सुधाकर चव्हाण यांनी दिली.

शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाचा कार्यक्रम होईल. यानंतर युवा, आश्वासक शास्त्रीय गायक अभयसिंग वाघचौरे यांचे शास्त्रीय गायन होईल. यानंतर पं. नानासाहेब पानसे यांच्या पखवाज घराण्याचे युवा पखवाज वादक कृष्णा साळुंखे यांचे पखवाज वादन रंगेल. संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शिष्या असलेल्या अंकिता जोशी यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

शनिवार दि. ४ एप्रिल रोजी कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाचा कार्यक्रम होईल. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन रंगेल. त्यानंतर पं. विश्वास जाधव यांच्या एकल तबला वादनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी यांच्या सुमधुर शास्त्रीय गायनाने होईल.

रविवार दि. ५ एप्रिल रोजी कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाच्या कार्यक्रमाने सायं ४.३० वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन होईल. त्यानंतर सतार नवाज उस्ताद बाले खान त्यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईस बाले खान यांचे सतारवादन उपस्थितांना अनुभवता येईल. उस्ताद बाले खान यांचे घराणे ‘सताररत्न’ या पदवीने ओळखले जाते. सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात या घराण्याचा मोठा वाटा आहे हे विशेष. २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा समारोप पंडिता डॉ. रोहिणी भाटे यांच्या शिष्या आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना ऋजुता सोमण यांच्या कथक नृत्य प्रस्तुतीने होईल.

याबरोबरच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कलाश्री पुरस्कार यावर्षी ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांना तर कलाश्री युवा पुरस्कार पं योगेश समसी यांचे शिष्य, युवा तबला वादक सोहम गोराणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. कलाश्री पुरस्काराचे हे २८ वे वर्ष असून महोत्सवात माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ कलाश्री पुरस्कार तर शकुंतला ढोरे यांच्या स्मरणार्थ कलाश्री युवा पुरस्कार अनुक्रमे आरती अंकलीकर टिकेकर व सोहम गोराणे यांना प्रदान करण्यात येईल. आमदार शंकर जगताप आणि महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी कळविले आहे.

महोत्सवादरम्यान तीनही दिवस पं. रामदास पळसुले, प्रशांत पांडव, चारुदत्त फडके, नंदकिशोर ढोरे, ऋषिकेश जगताप, रमाकांत राऊत, चेतन ताम्हणकर, स्मितीश कुर्वे हे तबलासाथ करतील तर पं. प्रभाकर पांडव, मिलिंद कुलकर्णी, अभिनय रवंदे, यश थिटे, गंगाधर शिंदे, अमेय बिचू, हरिभाऊ असतकर हे संवादिनी साथ करतील. याशिवाय गंभीर महाराज अवचर हे पखवाज साथ करतील. महोत्सवाचे निवेदन श्रीकांत चौगुले, नामदेव तळपे, नाना शिवले सर आणि आकाश थिटे करणार असल्याची माहितीही पं. सुधाकर चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading