Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

आपला हिंदू धर्म श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या एका निसरड्या पातळीवर -शर्मिष्ठा उत्पात-ताशी

पुणे : आपला हिंदू धर्म श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या एका निसरड्या पातळीवर आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक न कळल्यामुळे आपला धर्म वेगळ्या वाटेवर जात आहे, याची उदाहरणे आपण रोज ऐकत आहोत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक कळला पाहिजे. श्रद्धेच्या नावाखाली कोणत्याही गोष्टीला बळी न पडता आपण सजग राहून डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे. जेव्हा ज्ञानेंद्रिये जागृत करून तुम्ही परमेश्वराची भक्ती कराल, तेव्हा जीवनाचा भवसागर पार करू शकाल. कलियुगात परमेश्वराच्या नामस्मरणाने आपण तरणार आहोत, असे मत व्याख्यात्या शर्मिष्ठा उत्पात-ताशी यांनी व्यक्त केले.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने ‘सद्गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात शर्मिष्ठा उत्पात-ताशी यांचे ‘अलौकिक पंढरपूर’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी पंढरपूर कसे पाहिले पाहिजे, रुक्मिणी आणि पांडुरंगाच्या मूर्तीचे महात्म्य नेमके काय आहे, पांडुरंगाच्या मूर्तीवरील मुक्तकेशीची उमटलेली बोटे, पांडुरंगाची दिनचर्या आदी विषयांवर श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

शर्मिष्ठा उत्पात-ताशी म्हणाल्या, परमेश्वर कोणतेही कर्मकांड सांगत नाही. त्याला केवळ भक्तीची ओढ असते. ती भक्ती तुम्ही परमेश्वराच्या नामस्मरणातून करा. मुखी परमेश्वराचे नाम आणि मनी भाव असला की तुम्ही परमेश्वराच्या चरणी लीन होता. तुम्ही एकदा पंढरपूरच्या वारीला गेलात, तर तुम्हाला पांडुरंगाची ओढ कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

बुधवार, दि. १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सद्गुरु श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर गुरुवार, दि. २ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर मंदिरात महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading