Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

रामनामाच्या गजरात भक्तीमय श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

पुणे :  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या पावन जन्मोत्सवानिमित्त श्रीराम सेवा समितीच्या वतीने पुण्यात अत्यंत भक्तीमय, आध्यात्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या अखंड नामस्मरणाने परिसर दुमदुमून गेला होता. रामभक्तीच्या या दिव्य सोहळ्यात शेकडो भाविकांनी उपस्थित राहून भक्तिरसाचा आनंद लुटला.

अल्पबचत भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे विधिवत पूजन करण्यात आले. ईश्वरचंद गोयल, जयभगवान गोयल, पवन बंसल, पवन चमडिया, गुंजन नवाल, नरेंद्र गोयल, प्रेम मित्तल, सतीश अग्रवाल, योगेश जैन, पवन सराफ, आनंद अग्रवाल, राकेश अग्रवाल, रितेश अग्रवाल, गीता गोयल, रुची गोयल, राजेश मित्तल, सुनीता बंसल, नंदलाल पूरनचंद , द्वारका जालन यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर हरियाणातील सुप्रसिद्ध भक्तीगीत गायिका प्रियंका चौधरी आणि गायक अरविंद अग्रवाल यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तीरसाने ओथंबून गेले. त्यांच्या स्वरातून साकारलेल्या श्रीरामाच्या गुणगायनाने उपस्थित भाविकांना आत्मिक शांतीचा अनुभव दिला. ‘लोगो का हमें काम है करना, उनको ऊंचा उठाना है’ या संदेशपूर्ण भजनातून त्यांनी भक्तीबरोबरच समाजसेवेचे महत्त्वही अधोरेखित केले.

या कार्यक्रमात श्रीरामांचे परमभक्त बजरंगबली हनुमान यांचे प्रभावी सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. हनुमानाच्या वेशभूषेत रंगमंचावर अवतरलेल्या कलाकाराने उपस्थितांमध्ये ऊर्जा, उत्साह आणि भक्तिभाव जागवला. तसेच राधा-कृष्णाच्या पवित्र प्रेमभावनेवर आधारित सादरीकरण आणि गीते चतुर्वेदी यांनी सादर केलेल्या भावस्पर्शी गीतांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.
विशेषतः रक्षाबंधनाच्या भावनेवर आधारित, “मला त्रिलोकाची संपदा नको, परंतु ज्याच्या मनगटावर राखी बांधता येईल असा भाऊ हवा,” या ओळींनी सजलेल्या गीताने वातावरण भावुक केले. या गीताने विशेषतः महिला वर्गाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि बंधुभावाच्या पवित्र नात्याची जाणीव अधिक दृढ केली.

कार्यक्रमाची सांगता प्रभू श्रीरामांच्या मंगल आरतीने झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याने भक्तांच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेची नवचेतना निर्माण केली.
हा श्रीराम जन्मोत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता, समाजात एकात्मता, सेवा आणि संस्कारांची प्रेरणा देणारा आध्यात्मिक सोहळा ठरला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading