Saturday, May 9, 2026
ENTERTAINMENTLatest News

“‘सनई चौघडे’ मध्ये शर्वरीचा स्वॅग, कुटुंबासाठी झटणारी मुलगी प्रेक्षकांना भावणार !

‘सनई चौघडे’ मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी साळवी एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘शर्वरी परब’ ही तिची व्यक्तिरेखा एकदम बेधडक आणि बिनधास्त आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, तयारी, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे शर्वरी प्रमिला सुभाष परब. शर्वरी ही प्रचंड निर्मळ, स्वच्छंद आणि आनंदी मुलगी आहे. ती कुटुंबाशी खूप जोडलेली आहे. तिचा स्वभाव म्हणजे जशास तसे एकदम स्पष्टव्यक्ती अशी ती आहे. तिला पाठीमागून बोलणं अजिबात आवडत नाही. काही घडत असेल, बरोबर किंवा चुकीचं, जे काही असेल त्यासाठी ती स्वतःचं स्पष्ट मत मांडणारी मुलगी आहे. तिला आपल्या कुटुंबावर खूप जीव आहे. मालिकेमध्ये परब फॅमिली ही स्वामीभक्त आहे, स्वामींच्या कृपेने त्यांना जे काही मिळालेलं आहे, त्यात ते समाधानी आहेत. स्वामी सोबत असल्यामुळे आपल्याकडे काही गोष्टी नाहीत किंवा आपल्याकडे बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे, अशा गोष्टी त्यांच्या मनात येत नाहीत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खूप खुश आहे. शर्वरी ही ग्रॅज्युएट मुलगी आहे. ती एम.डी.ची रोज क्वीन आहे आणि हा तिचा वेगळा स्वॅग आहे. ती नोकरीच्या शोधात आहे. पण नोकरी मिळेपर्यंत ती तिच्या आईला, म्हणजे पमाला, तिच्या टिफिन व्यवसायात मदत करत असते. ती आपल्या स्कूटीवरून टिफिन डिलिव्हरी करत असते. या मालिकेत शर्वरीच्या स्कूटीचं नाव ‘बेबो’ आहे. बेबोचंही शर्वरीच्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. तसेच तिचे वडील कंडक्टर आहेत, त्यामुळे या सगळ्याची जाण शर्वरीला आहे. शर्वरीमध्ये एक भावना आहे की आपली मॅनेजमेंट स्किल्स आणि व्यवहाराची समज वापरून तिने आपल्या आई-बाबांना मदत करावी, आपल्या कुटुंबासाठी कसा हातभार लावता येईल यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते.

शर्वरी या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा मला कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘वागळे की दुनिया ‘ ही हिंदी मालिका  तब्बल ५ वर्ष केल्यानंतर मला शर्वरीची भूमिकेसाठी कॉल आला. मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजते.  माझी इच्छा होती की मला मराठी मालिका करायला मिळावी, ज्यामधली माझी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहावी. आणि स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली. मालिकेत शर्वरी आणि जय हे खूप विरुद्ध करेक्टर असणार आहेत. जेव्हा हे दोन्ही करेक्टर एकमेकांच्या समोर येतील, तेव्हा काय धुमाकूळ होणार आहे हे बघण्यासारखं असेल.

शर्वरीच्या भूमिकेची तयारी करायला मला फारसं काही करावं लागलं नाही, कारण मी आणि शर्वरी मुळात खूप सारख्याच आहोत असं म्हणायला हरकत नाही. मी सुद्धा मालिकेतील शर्वरीसारखीच मस्तीखोर, बडबडी आणि नौटंकी आहे. मला ड्रामा करायला, माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला आणि त्यांच्यासाठी काहीही करायला नेहमीच आवडतं. खास तयारी सांगायची झाली तर मी शर्वरीच्या करेक्टरसाठी स्कूटी चालवायला शिकले. कारण ती आपल्या आईला टिफिन व्यवसायात मदत करण्यासाठी टिफिन डिलिव्हरीसाठी स्कूटीवरून जाते. मला आधी स्कूटी चालवायला भीती वाटायची, पण शर्वरीची भूमिका लक्षात घेऊन मी स्कूटी शिकले. आणि आता मी गर्दीतसुद्धा स्कूटी चालवू शकते, याचा मला खूप आनंद आहे. मी याआधी जी मालिका केली होती त्यामध्ये मी अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी साकारली होती. पण आता शर्वरी ही खूप समजूतदार आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी मुलगी आहे. ती ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे तिची विचारसरणीही वेगळी आहे. प्रत्येकासोबत डील करण्याची तिची एक वेगळी पद्धत आहे. म्हणून मला वाटतं की ही भूमिका माझ्यासाठी अधिक मजेदार असणार आहे आणि मला काम करतानाही खूप मजा येणार आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद मला मिक्स पाहायला मिळाला. प्रेक्षकांचे शॉक आणि सरप्राईज असे दोन्ही रिऍक्शन्स मला पाहायला मिळाले. हिंदी मालिकेतून आता मी मराठी मालिकेत दिसणार,  तेही इतक्या वर्षांनंतर हे त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. मी याआधी जी मराठी मालिका करत होते, त्याचे प्रेक्षकही या बातमीनंतर खूप आनंदी झाले. माझे हिंदी मालिकेचे फॅन्सही तितकेच उत्सुक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्यासाठी आम्ही तुमची भूमिका पाहण्यासाठी तुमचा मराठी कार्यक्रमही पाहायला सुरुवात करू. हे सगळं खूप छान आहे आणि मला खूप आनंद वाटत आहे. आमची को-ॲक्टर्स आणि प्रोडक्शन टीम खूप छान आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला अगदी घरगुती वातावरण वाटतं. माझी सगळ्यांशी मैत्रीही झाली आहे. माझा स्वभावच असा आहे की मी एखाद्याशी बोलल्याशिवाय, बडबड केल्याशिवाय काम करू शकत नाही. एवढी फ्रेंडली मी आहे. हळूहळू काम करताना कदाचित काही कालावधीनंतर मला इथे माझी खास मैत्रीण मिळेल असं मला वाटतं.

शूटिंगदरम्यानचा एखादा किस्सा सांगायचा  तर शूटिंग चालू असताना एक किस्सा झाला होता. हॉस्पिटलचं शूटिंग चालू होतं. आम्ही हॉस्पिटलच्या खाली शूट करत होतो. मी, जय आणि मॅक. तिथे प्रोडक्शन आणि चॅनलचे सगळे लोकही होते. शूटिंगदरम्यान अचानक गर्दीतून अंदाजे पन्नास वर्षांच्या एक महिला पुढे आल्या आणि म्हणाल्या की मला चिन्मयीसोबत फोटो काढायचा आहे. माझा मुलगा सोबत आहे, तो फोटो काढेल. आमचे प्रोड्युसर राजू सरांनी त्याला परवानगी दिली. आमचे फोटो काढून झाल्यानंतर त्या महिलेने आम्हाला खूप आशीर्वाद दिले. त्या म्हणाल्या, “तुमची मालिका खूप छान चालेल. तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद.” ते ऐकून आम्ही खूपच भारावून गेले. शूटच्या पहिल्याच दिवशी एवढा मस्त अनुभव आला. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही असं मला वाटतं.

तेव्हा शर्वरीला बघायला विसरू नका “सनई चौघडे” दररोज रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading