श्रेया ही वैविध्य जपणारी अतिशय गुणी अभिनेत्री; ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचे उद्गार
पुणे : अनेकदा कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिका मिळत राहतात. त्यांचा साचा होऊ शकतो. पण श्रेया भाग्यवान आहे. तिने आपल्या आजवरच्या कामात कमालीचे वैविध्य राखले आहे आणि ती अतिशय गुणी अभिनेत्री आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले.
राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार यावर्षी चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांना गुप्ते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रुपये ११ हजार रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर, उदय नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे संस्थापक समीर बेलवलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला होता.
वंदना गुप्ते यांनी याप्रसंगी स्वतःच्या कारकिर्दीचेही काही प्रसंग कथन केले. मी राम नगरकर यांचा अभिनय पाहिला आहे, असे त्या म्हणाल्या. श्रेयाच्या भात्यात अभिनयाचे असंख्य बाण आहेत. तिने उत्कृष्ट अभिनयाचे रंग प्रेक्षकांना दाखवले आहेत. तिने भूमिकांमध्ये जपलेल्या वैविध्याची असूया वाटावी, असे तिचे काम आहे, असेही त्या म्हणाल्या.
पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले यांनी श्रेया बुगडे यांच्याशी संवाद साधला. शाळकरी वयापासून अभिनयाची आवड जोपासल्याचे सांगून श्रेया म्हणाली, “रत्नाकर मतकरी यांच्या ‘चमत्कार झालाच पाहिजे’, या बालनाट्यातून मला खरा ब्रेक मिळाला. माझा कल मला समजला आणि कुटुंबियांनीही सतत पाठिंबा दिला. ‘वाटेवरती काचा गं’, या नाटकातून अभिनयाचा वेगळा रंग मिळाला. कॉलेजपासून मी सातत्याने रंगभूमीवर स्पर्धांतून वावरले आणि सलग १४ वर्षे मी उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळवले होते.”
‘फू बाई फू’ मुळे छोट्या पडद्यावरचे यश पाहिले आणि ‘चला हवा येऊ द्या’, या सलग १० वर्षे गाजत राहिलेल्या शो मुळे मला खूप काही शिकता आले. आमची टीम, आमच्यातली मैत्री, जुळलेली केमिस्ट्री हे सारे विलक्षण होते. प्रमोशनल हेतूने सुरू केलेला हा शो, अशा पद्धतीने यशाच्या शिखरावर जाणे, आमच्यासाठी आनंदाचे तर होतेच, पण हा काळ प्रत्येकाला खूप काही देणारा ठरला. याच शो ला दुसऱ्या वेळी प्रतिसाद मिळाला नाही, याचे कारण प्रेक्षकांची सवय मोडली, हे असावे, असेही ती म्हणाली.
कलाकार सतत दिसत राहिल्याने अतिपरिचयात् चा धोका जाणवतो का, या प्रश्नाला उत्तर देताना श्रेया म्हणाली, “आमची पिढी आणि आताची नवी पिढी याच्या उलट विचार आणि कृती करणारी आहे. जितके अधिक दिसू, तेवढे चांगले, अशा विचाराने ही पिढी वावरते. सोशल मिडियाची सर्व व्यासपीठे अधिकाधिक वापरते. प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे, त्याचा हा परिणाम असावा.” भविष्यात मला माझा वैशिष्ट्यपूर्ण शो करण्याची इच्छा आहे. ज्यातून समाजातील काही गरजू घटकांना काही पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी मला साह्य करता येईल, असेही तिने सांगितले.
समीर बेलवलकर यांनी बेलवलकर सांस्कृतिक मंचाविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “विनोदाचे अनेक पैलू असतात. पण खिल्ली, टवाळी, चेष्टा असे न करता निखळ विनोद जपणाऱ्या आणि प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या कलाकाराचे कौतुक या पुरस्काराच्या निमित्ताने केले जाते. हे पुरस्कार रसिकांच्या वतीनेच आम्ही देतो.”
डॉ. वैजयंती नगरकर म्हणाल्या, “आजच्या धकाधकीच्या, अनिश्चिततेच्या काळात आनंद आणि हसू हरवत चालले आहे. ते सर्वसामान्यांना मिळवून देणाऱ्या कलाकारांचा सन्मान म्हणून, आणि हाच भाव मनात ठेवून ज्यांनी सदैव काम केले, त्या रामभाऊ नगरकरांच्या स्मृती जपण्यासाठी या पुरस्काराचे प्रयोजन आहे.” संध्या नगरकर यांनी मानपत्राचे वाचन केले तर मंदा हेगडे यांनी आभार मानले.
