Monday, May 25, 2026
Latest NewsSports

वाघोलीत १८ ते २२ मार्च दरम्यान ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

– विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी.
*पुणे*: महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ६८ वे अधिवेशन यंदा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने ही स्पर्धा १८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच इतक्या भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात स्व. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून केली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील कुस्तीपटूंनी मोठी कामगिरी करत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. गेली ६७ वर्षे सातत्याने या स्पर्धेचे आयोजन होत असून यंदा ६८वे अधिवेशन पार पडत आहे.

स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव पाटील हे पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक असून त्यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, वाघोली गावचे माजी उपसरपंच तसेच माजी पोलीस पाटील अशी विविध पदे भूषवली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.

ही स्पर्धा स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी, बाजार मैदान, वाघोली (पुणे) येथे पार पडणार आहे. क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून क्रीडानगरीला “स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी” असे नाव देण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन १८ मार्च रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर २२ मार्च रोजी समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

*बक्षिसे*:

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. पै. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र केसरी विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी
उपमहाराष्ट्र केसरी विजेत्याला स्कॉर्पिओ N गाडी
तसेच माती व गादी विभागातील विविध वयोगटातील
सुवर्णपदक विजेत्यांना एकूण १८ बुलेट मोटारसायकली
रौप्यपदक विजेत्यांना स्प्लेंडर मोटारसायकल
देऊन गौरविण्यात येणार आहे.

*आखाड्यांची व्यवस्था*:

स्पर्धेसाठी मातीचे दोन आणि मॅटचे दोन असे एकूण चार आखाडे उभारण्यात येणार आहेत. मातीच्या आखाड्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा कुस्ती संघांकडून माती आणून विशेष आखाडा तयार करण्यात येत आहे.

*सहभागी मल्ल:*

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न असलेल्या राज्यातील ४२ जिल्हा कुस्ती संघांमधून सुमारे १५०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यातील अनेक नामांकित तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

*आसन व पार्किंग व्यवस्था*:

प्रेक्षकांसाठी ३५ ते ४० हजार क्षमतेचे भव्य स्टेडियम उभारण्यात येत आहे. तसेच वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

सातव हायस्कूल, मोझे कॉलेज पार्किंग, बाजारतळ (VIP), केसनंद फाटा बसस्टॉप समोर, आव्हाळवाडी रोड – मुकेश सातव प्लॉट, तुकाराम सातव प्लॉट, जोशी पार्किंग आणि अनिल सातव प्लॉट येथे पार्किंगची सोय उपलब्ध असेल.

*विविध सुविधा*:

स्पर्धेदरम्यान पंच, मल्ल व प्रशिक्षकांसाठी सुरक्षा, आरोग्य, निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी मल्लांना ट्रॅक सूट, जिम बॅग आणि खुराक देण्यात येणार आहे. तसेच कुस्तीप्रेमींना स्पर्धा पाहता यावी यासाठी लाईव्ह टेलिकास्टची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रीडानगरीच्या परिसरात पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा देखील उपलब्ध असेल.

*विशेष स्पर्धा:*

तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेदरम्यान विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

उत्कृष्ट ५ रिल्स तयार करणाऱ्यास आयफोन
उत्कृष्ट फोटोग्राफी करणाऱ्यास कॅमेरा लेन्स
उत्कृष्ट रॅप सॉंग करणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस

*बोधचिन्ह अनावरण*:

या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र केसरी विजेत्याला दिल्या जाणाऱ्या मानाच्या गदेचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मानाच्या आणि ऐतिहासिक स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading