Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

महिला सेवा मंडळाच्या दत्तक विभागाचे नूतनीकरण उद्घाटन संपन्न

पुणे :  निराधार आणि असुरक्षित बालकांच्या संगोपन, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी कटिबद्ध असणाऱ्या कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम संस्थेच्या दत्तक विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. केएसएच इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून हे नूतनीकरण शक्य झाले आहे. महिला सेवा मंडळाच्या दत्तक विभागाला ‘वात्सल्य तीर्थ’ असे अन्वर्थक नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ममत्वपूर्ण संगोपनाचे पवित्र स्थान असा होतो.

दत्तक विभागाच्या या नूतनीकरण उपक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केएसएच इंटरनॅशनलचे संचालक कुशल हेगडे आणि पुष्पा हेगडे, संस्थेच्या अध्यक्षा किशोरी ओगले, सचिव राखी शेट्टी, कोषाध्यक्ष स्नेहा पाळंदे, विश्वस्त तनुजा पुसाळकर, चाईल्ड वेल्फेअर कम्युनिटी टू च्या अध्यक्षा नंदिता अंबिके, मंडळाच्या व्यवस्थापकीय सदस्य ज्योती कुलकर्णी, मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी सुनीता केतकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक सुमनताई किर्लोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सेवा मंडळ, पुणे यांच्या वतीने तब्बल ८६ वर्षांपासून निराधार व असुरक्षित मुलांच्या संगोपन, संरक्षण व पुनर्वसनासाठी हे केंद्र कार्यरत आहे. पुण्यात दत्तक केंद्र (अडॉप्शन सेंटर), बालसंगोपन गृह (चाईल्डकेअर होम) आणि रेस्क्यू होम या तिन्ही सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी महिला सेवा मंडळ ही एकमेव संस्था आहे, अशी माहिती अध्यक्ष किशोरी ओगले यांनी त्यांच्या स्वागतपर प्रास्ताविकात दिली.

संस्थेची स्पेशल अडॉप्शन एजन्सी (एसएए) देखील अनेक वर्षांपासून कार्यरत असून, तिच्या माध्यमातून अनेक मुलांना भारतात तसेच परदेशात प्रेमळ व सुरक्षित दत्तक कुटुंबे मिळाली आहेत. प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि स्थिर कौटुंबिक वातावरण मिळावे या उद्देशाने संस्था दत्तक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. मुलांसाठी आणि संभाव्य दत्तक पालकांसाठी अधिक पोषक, उत्साही आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देश यामागे आहे. संस्थेला समाजातील दाते, हितचिंतक आणि विविध संस्थांकडून मिळणारे सहकार्य लक्षणीय आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे असुरक्षित मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य होत असल्याची भावना ओगले यांनी संस्थेच्या वतीने व्यक्त केली.

औपचारिक उद्घाटनानंतर कुशल व पुष्पा हेगडे तसेच अन्य मान्यवरांनी नूतनीकरण केलेल्या कक्षाची पाहणी करून, समाधान व्यक्त केले. रोहिणी खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading