अहिल्यानगरमधील ३ लाखांहून अधिक नागरिकांसाठी ‘कॅन्सर केअर’ उपक्रम, लवकर निदान आणि उपचारांवर भर
इंडियन कॅन्सर सोसायटी, अल्केम फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात कर्करोग जागरूकता आणि तपासणी मोहिमेचे आयोजन.
अहिल्यानगर, ५ मार्च २०२६: इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस), अल्केम फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा आरोग्य विभाग यांनी एकत्रितरित्या ‘सतर्क’ हा समुदाय-केंद्रित प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश संगमनेर, अकोला, पारनेर आणि राहुरी या तालुक्यांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करणे आणि संगमनेर तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवणे हा आहे.
या सर्वसमावेशक कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा कार्यकर्त्यांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ते जिल्हाभर कर्करोगाबद्दल जनजागृती करू शकतील. यासोबतच संगमनेर तालुक्यात मुखाच्या, स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी विनामूल्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील. या तीन प्रकारच्या कर्करोगांनी ग्रस्त रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच, स्क्रीनिंगच्या माध्यमातून या आजारांचे वेळीच निदान करणे अत्यंत आवश्यक आहे. कर्करोगपूर्व लक्षणे आणि कर्करोगाचे निदान प्राथमिक पातळीवरच झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे आणि रुग्णांच्या उपचारांवरील वाढता खर्चही वाचवणे शक्य आहे.
केवळ उपचारच नाही, तर कॅन्सरबद्दल समाजात असलेली भीती आणि चुकीचे समज दूर करणे हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे ध्येय आहे. याशिवाय, शाळा आणि कॉलेजमधील मुला-मुलींसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातील. यामुळे नवीन पिढी आरोग्याबाबत अधिक जागरूक होईल आणि भविष्यात एक निरोगी समाज घडवण्यास मदत होईल.
हा कार्यक्रम सरकारी प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी आखला आहे. विशेषतः गरीब आणि गरजू लोकांसाठी हे वरदान ठरणार आहे. संगमनेर, अकोला, पारनेर आणि राहुरीमध्ये विविध माध्यमांतून ३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत आरोग्य संदेश पोहोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या मोहिमेत एकूण ४५ तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, ज्यामध्ये ३,१५० लोकांची प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि १ लाख लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाईल. ही तपासणी एचपीव्ही, डीएनए सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एसएमबीटी रुग्णालयाचे मोठे सहकार्य लाभणार आहे.
श्रीमती उषा थोरात (नॅशनल मॅनेजिंग ट्रस्टी, इंडियन कॅन्सर सोसायटी) यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना म्हटले की, “कॅन्सरविरुद्धच्या लढाईत अल्केम फाऊंडेशनसोबतची ही भागीदारी अत्यंत मोलाची आहे. कॅन्सरची लक्षणे, त्यामागील कारणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची पुरेशी माहिती असणे, हीच या आजारावर मात करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. लोकांकडे योग्य माहिती असेल, तरच ते स्वतःच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होतील. आपण सर्वांनी मिळून अशा भविष्यासाठी प्रयत्न करूया जिथे कॅन्सरचे निदान वेळीच होईल, प्रभावी उपचार मिळतील आणि रुग्ण या आजारातून पूर्णपणे सावरून सुदृढ आयुष्य जगू शकतील.”
अल्केम फाऊंडेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “आमचा हा कॅन्सर केअर कार्यक्रम तळागाळातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये इंडियन कॅन्सर सोसायटीसोबत काम करताना अशा दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, जिथे लोकांना तपासणी आणि मार्गदर्शनाच्या सुविधा सहजपणे उपबल्ध होत नाहीत. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना योग्य वेळी योग्य वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. “
डॉ. बापूसाहेब नगरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, अहिल्यानगर यांनी म्हटले की, “आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत मोलाचा ठरेल. समाजात सर्वाधिक आढळणाऱ्या तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली, तर ते स्वतःहून तपासणीसाठी पुढे येतील. यामुळे आजाराचे वेळेत निदान होईल आणि कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यास मोठी मदत होईल.”
