कातकरी समाजाची अपूर्ण घरे पूर्ण करण्यामध्ये प्रोजेक्ट आशियानाला मोठे यश
पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर बांधता यावे म्हणून केंद्र सरकारने जन-मन योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्याचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, जिल्ह्यातील अनेक गरीब नागरिकांना त्यानंतर आर्थिक अडचणींमुळे पुढे आपले घर पूर्ण करता येत नव्हते. भोर तालुक्यातील वडगाव डाळ या गावातील कातकरी समाजातील नागरिकांची परिस्थिती अशीच होती. या कुटुंबांचे अपूर्ण राहिलेले घर पूर्ण करण्याचे काम रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे आणि परम निश्चय फाउंडेशन यांच्या पुढाकाराने ‘प्रोजेक्ट आशियाना’ अंतर्गत नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती नुकतीच रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी तर्फे आयोजित एका कार्यक्रमात देण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे आणि सुशांत गुप्ता, परमिंदर कौर यांच्या परम निश्चय फाउंडेशन यांनी हाती घेतलेल्या आशियाना या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वडगाव डाळ या गावातील कातकरी समाजाची ३७ अपूर्ण घरे पूर्ण करण्यात आली आहेत. नजीकच्या भविष्यात पुणे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अशा प्रकारे अपूर्ण असणारी घरे पूर्ण करून हा आकडा ५०० पर्यत नेण्याचा रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणेचा मानस आहे. रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे यांच्यातर्फे सेनापती बापट रस्त्यावरील जे डब्लू मॅरिएट येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता सिम्पोझियम या कार्यक्रमामध्ये आशियाना या उपक्रमाचे सादरीकरण करीत त्याविषयी माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणेचे अध्यक्ष भावीन देसाई, सचिव नरेंद्र संचेती यांसोबतच वर्धमान गांधी, अंकुश पारख, पुणे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना अंकुश पारख म्हणाले की, “सरकारकडून अनुदान मिळाले तरी घर पूर्ण नसल्यामुळे वडगाव डाळ गावात राहणाऱ्या नागरिकांना उन्हा-पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागायचा. विशेष करून पावसाळ्यात घरावर छत नसल्यामुळे त्यावर प्लस्टिक टाकणे अशा उपाययोजना कराव्या लागायच्या. रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणेने हाती घेतलेल्या या उपक्रमाद्वारे गावाला भेट देत सर्वेक्षण करण्यात आले. घरासाठी कोणत्या कुटुंबाला कोणत्या प्रकारची मदत आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यात आला. त्या सर्वेक्षणाद्वारे घरांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी घरावर पत्रे, दरवाजे, घराला रंगरंगोटी करणे, काही ठिकाणी अपूर्ण घरांची उभारणी करणे अशी कामे करण्यात आली.”
या गावात राहणारे लोक बहुतांश कातकरी समाजाचे असल्याने ते रोजंदारीवर काम करतात. त्यांना आपले हक्काचे पूर्ण घर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एक आंतरिक समाधान देणारा होता असे वर्धमान गांधी यांनी सांगितले.
आशियाना उपक्रमाच्या पहिल्या टप्यामध्ये गावातील ३७ कातकरी कुटुंबांना त्यांचे घर उभे करण्यात मदत केल्यामुळे त्यांचे आयुष्य अधिक सुखकर बनले आहे. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणेला जिल्हा परिषदेकडून अपूर्ण घरांची यादी यादी मिळाली, त्याची तपासणी आणि सर्व्हेक्षण करून आम्ही गरजू नागरिकांपर्यंत पोहोचलो. नजीकच्या भविष्यात आशियाना या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवण्याचे आमचे ध्येय असल्याकड संचेती यांनी लक्ष वेधले. पुणे जिल्हयातील आदिवासी बहुल गावांमध्ये जाऊन हा उपक्रम राबवण्याचा रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणेचा मानस असून या अंतर्गत जिल्ह्यातील मंचर, चाकण या भागातील गावांमध्ये पोहचून हा उपक्रम पुढे नेण्याचे नियोजन सुरु असल्याचे अंकुश पारख यांनी यावेळी स्पष्ट केले.
