Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

‘गोंगाटात विचार हरवू नका’ २५ वर्षांची स्पीकरची परंपरा मोडीत काढून १ हजार अनुयायांना पुस्तक वाटप व मूकपटाचे ऐतिहासिक आयोजन

 

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात यंदा एक अत्यंत क्रांतिकारी आणि वैचारिक उत्सव साजरा केला जाणार आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती’च्या आवाहनाला प्रतिसाद देत, भिमसेवा प्रतिष्ठान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गेली २५ वर्षे सुरू असलेली स्पीकरची (डीजे) परंपरा यंदा कायमची बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

पुस्तकांद्वारे विचारांची पेरणी:
मिरवणुकीतील मोठ्या आवाजाचा मानवी आरोग्यावर होणारा घातक परिणाम लक्षात घेऊन आणि नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनांपासून बोध घेत, यंदा स्पीकरवर होणारा अवाढव्य खर्च टाळून १,००० अनुयायांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके मोफत वाटली जाणार आहेत. “वाचाल तर वाचाल” हा बाबासाहेबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

विशेष आकर्षण: ३० फुटांचे बुद्धरूप आणि ‘मूकपट’:
यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ३० फुटांचे तथागतांचे भव्य बुद्धरूप असलेला विशेष देखावा. तसेच, “गोंगाटात विचार हरवू नका” हा संदेश देण्यासाठी तथागत बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ‘तीन पात्री मूकपट’ (Silent Play) आयोजित करण्यात आला आहे. गोंगाटापेक्षा शांततेच्या माध्यमातून विचारांचा जागर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हा निर्णय मा. रामभाऊ डंबाळे (संस्थापक अध्यक्ष), मा. राहुलभाऊ डंबाळे (मार्गदर्शक) आणि मा. सुवर्णाताई डंबाळे (रिपब्लिकन नेत्या) यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांत सुर्वे, प्रदीप कांबळे, निखिल बहुले, अविराज मराठे आणि नासिर खान या कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला आहे.

मध्यवर्ती समितीचे आवाहन:
पुणे स्टेशन परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची अलोट गर्दी लक्षात घेता, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून इतर मंडळांनीही स्पीकर लावू नयेत, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading