Saturday, April 11, 2026
Latest NewsPUNE

बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या स्टेम एज्युकेशनचा आत्मा मानवकेंद्री असावा

 

जपानच्या एहिमे विद्यापीठातील तज्ज्ञ प्रो. सुमिदा यांचे प्रतिपादन
केजीईआरसीच्या तपःपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :  शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांनी कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचा विचार प्रयोगशीलता, नवकल्पना आणि सर्जनशीलतेच्या आधारे करावा. स्टेम एज्युकेशन (सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमेटिक्स) पद्धतीचा आत्माही मानवकेंद्री असावा, असे प्रतिपादन जपानमधल्या मात्सुयामा येथील एहिमे विद्यापीठाच्या सेंटर फॉर गिफ्टेड एज्युकेशन अँड टॅलेंटेड डेव्हलपमेंट (ईयु – गेट) या विद्याशाखा विभागाचे संचालक प्रोफेसर मनबु सुमिदा यांनी केले.

कावेरी गिफ्टेड एज्युकेशन ॲड रिसर्च सेंटर (केजीईआरसी)च्या तपःपूर्तीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रो. सुमिदा यांनी जपानमधील बुद्धीमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील उपक्रम, शिक्षणपद्धती यांविषयीची माहिती दिली. गणेशनगर, एरंडवणे येथील कन्नडा संघाच्या आवारात हा कार्यक्रम झाला. यावेळी एहिमे विद्यापीठाच्या शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या स्पेशल नीड्स एज्युकेशन स्कूलचे उपप्राचार्य ताकाशी कावामोतो, तसेच कन्नड संघाच्या सचिव आणि केजीईआरसीच्या संस्थापक संचालिका मालती कलमाडी, केजीईआरसीच्या प्रमुख – सेंटर इन चार्ज सुमती श्रीनिवासन आणि जपानमधून आलेल्या संजिता प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रो. सुमिदा पुढे म्हणाले, “तथ्य आणि वस्तुनिष्ठ शोधांच्या संशोधनापुरते विज्ञान मर्यादित नाही. इतिहास, भाषा व जागतिक दृष्टीकोन सामावून घेणाऱ्या वैज्ञानिक संस्कृतीचा तो घटक आहे. या जागतिक दृष्टीकोनाची सांगड जपानने स्वतःच्या पारंपरिक ज्ञानाशी घालून, त्याला राष्ट्रीय स्वरूप दिले. पाश्चात्त्यांचा निसर्गाविषयीचा दृष्टीकोन वस्तुनिष्ठ व मर्यादित आहे, तर जपानचा दृष्टीकोन सर्वसमावेशक आहे. पाश्चात्त्य लोक निसर्गाचा दूरस्थ, विश्लेषणात्मक विचार करतात, तर जपानी लोक मनुष्य हा निसर्गाचाच एक घटक आहे, या भूमिकेतून विचार करतात. विज्ञान विश्वात्मक आहे, ती कुणा एका देशाची मिरासदारी नाही. अन्यथा जपानमध्ये इतक्या मोठ्या संख्येने नोबेलप्राप्त संशोधक निर्माण झाले नसते.”

जपानमधील स्टेम एज्युकेशनवर भर देणाऱ्या अकादमीमधील अनुभव सांगताना ते म्हणाले की, येथील बुद्धीची देवदत्त देणगी लाभलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांप्रमाणेच उपक्रम, प्रयोगांवर आधारित शिक्षणपद्धती राबविली जाते. ही मुले ५ वर्षे व त्याहून मोठी आहेत. या अकादमीने नवकल्पना, सर्जनशीलता, प्रयोगशीलतेवर भर दिला आहे. त्यातून त्यांच्या निरीक्षण, चौकस वृत्ती वसंशोधन यांचा विकास व्हावा, असा प्रयत्न आहे. केजीईआरसी या संदर्भात करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे असेही ते म्हणाले.

मालती कलमाडी यांनी स्टेम एज्युकेशन संकल्पनेविषयी शाळा, शैक्षणिक संस्था, पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जाणीवजागृतीची गरज, शिक्षकांचे प्रशिक्षण, संशोधन आवश्यक असल्याचे सांगितले. केजीईआरसी अंतर्गत उपक्रम प्रमुख डॉ. समीना मनासावाला यांनी केजीईआरसीची १२ वर्षांची वाटचाल विशद केली. कावेरी स्टेम नर्चरिंग प्लॅन याविषयी कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या ॲकॅडमिक्स अँड लर्निंग प्रमुख पल्लवी नाईक, डॉ. कलमाडी हास्यकूल, बाणेरच्या प्राचार्या डॉ. माधुरी चित्तेवान, तसेच कलमाडी शामराव हायस्कूलच्या विविध शाळांमधील शिक्षकांनी सादरीकरण केले. एस. बी. पाटील पब्लिक स्कूल तसेच दस्तूर ग्रुप ऑफ स्कूल्समधील शिक्षक तसेच शिक्षणतज्ज्ञांचीही उपस्थिती यावेळी होती. कावेरी काउन्सलिंग, एमपॉवरमेंट अँड गिफ्टेड सेंटरच्या सहायक संचालिका डॉ. देवसेना देसाई यांनी प्रो. सुमिदा यांचा परिचय करून दिला.. ईशानी पांडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading