Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मासिक पाळीतील सन्मानाला नवी ओळख -गडचिरोलीतील पीरीयड पॉझिटीव्ह हॉलिडे होमचे उद्घाटन

गडचिरोली : पुणे येथील मुकुल माधव फाऊंडेशन (एमएमएफ) या नामांकित सामाजिक संस्थेने गडचिरोली जिल्ह्यातील धनोर तालुक्यात महिलांच्या आरोग्य व सन्मानासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अतिदुर्गम, मागास व नक्षलग्रस्त भागात संस्थेचे २४ वे ‘पीरियड पॉझिटिव्ह हॉलिडे होम’ पूर्ण झाले असून, ग्रामीण व आदिवासी महिलांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरत आहे.

गडचिरोलीतील अनेक दुर्गम गावांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना व मुलींना गावाबाहेरील जंगलालगत असलेल्या ‘कुरमा घर’ या झोपड्यांमध्ये राहण्यास भाग पाडले जात होते. असुरक्षित, अस्वच्छ आणि अमानवी परिस्थितीत राहावे लागल्याने महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत होता. सर्पदंश, हिंस्त्र प्राणी तसेच सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याने ही प्रथा मानवी हक्कांचे उल्लंघन ठरत होती.

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती बहिष्काराचे कारण ठरू नये, या भूमिकेतून एमएमएफने ‘पीरियड पॉझिटिव्ह हॉलिडे होम्स’ ही संकल्पना राबवली. २०२० साली सुरू झालेल्या या उपक्रमात महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक निवाऱ्याची उभारणी करण्यात आली. या घरांमध्ये स्वच्छ शौचालये, स्नानगृहे, पाणीपुरवठा, सौरऊर्जेवरील प्रकाश व्यवस्था, सुरक्षित झोपण्याची सोय, स्वयंपाकघर, स्वच्छ पिण्याचे पाणी व प्राथमिक उपचार साहित्य अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रमुख देणगीदार म्हणून सातत्याने सहकार्य करत आहे. तसेच युवा परिवर्तन यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचा सहभाग लाभला आहे. प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांपासून तयार केलेल्या विटांचा वापर करून पर्यावरणपूरक बांधकाम करण्यात आले असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि ग्रीन जॉब्सना चालना मिळाली आहे.

या उपक्रमामुळे महिलांना मासिक पाळीच्या काळात सुरक्षितता मिळाल्याबरोबरच, त्यांचा आत्मविश्वास आणि सामाजिक सन्मान वाढला आहे. कौशल्य विकास व उपजीविकेच्या संधी उपलब्ध झाल्याने महिलांचे सक्षमीकरणही घडून येत आहे.

धनोर तालुक्यातील पावनी येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी एमएमएफ, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व युवा परिवर्तन यांचे कौतुक करत, महिलांच्या आरोग्य आणि स्वावलंबनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

आज हा उपक्रम केवळ विश्रामगृहांपुरता मर्यादित न राहता, महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचे प्रभावी केंद्र ठरत असून, गडचिरोलीसह देशभरात सामाजिक परिवर्तनाचा नवा आदर्श निर्माण करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading