राज ठाकरे व एकनाथ शिंदे भेटीचा युतीवर परिणाम नाही
एकनाथ शिंदे या प्रवृत्तीशी आपले भांडण असल्याचे राऊत यांचे प्रतिपादन
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, या भेटीमुळे एकूणच ठाकरे गटात असलेली खदखद त्यांच्याकडून व्यक्त झाली.
एकनाथ शिंदे या प्रवृत्तीशी आपले कडाक्याचे भांडण आहे.शिंदे यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. विचाराशी गद्दारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा स्वार्थ त्याच्या पाठीशी होता आणि आजही आहे, असे राऊत म्हणाले.
ज्यांनी महाराष्ट्राशी, मराठी माणसाशी गद्दारी केली त्यांच्याशी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी हे भांडण आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चोरीतून शिंदे यांचे नंदनवन उभे राहिले आहे, अशी टीका राऊत यांनी केली. राज ठाकरे अशा शिंदे यांना भेटण्यासाठी का गेले, वगैरे प्रश्न राज ठाकरे यांनाच विचारा. आम्ही काही हेरगिरी करत नाही. या भेटीबद्दल आम्हाला प्रसारमाध्यमांमधूनच कळले. कोणी कोणाला भेटावे याचे बंधन कोणावर घातले जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाला सहकार्य करण्याची ग्वाही राज ठाकरे यांनी दिल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ती त्यांची भूमिका आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते त्या पक्षाचे नेते आहेत आमचे मात्र बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी करणाऱ्यांबरोबर भांडण आहे आणि राहील. त्यात एक दिवस आमचा विजय होईल, असा दावाही राऊत यांनी केला.
चंद्रपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा महापौर होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, या काँग्रेसची ही मोठी चूक आहे. भाजपाला मदत करण्याची शिवसेनेची किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका नव्हती आणि कधीही असणार नाही, असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. ते राज्यसभेवर जाण्यास तयार आहेत. महाविकास आघाडीचा एक उमेदवार निश्चित निवडून येऊ शकतो. लवकरच बैठकीत याबद्दल निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत शरद पवार भाजपबरोबर जाणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे अशी आपली इच्छा आहे. इतरांचीही असणार आहे. ठाकरे यांनी विधिमंडळात असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्याशी. चर्चा करणार आहे, असेही राऊत म्हणाले.
फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांना ज्या गेटवे ऑफ इंडियावर नेण्यात आले, त्याच समुद्रात १० वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाचे जलपूजन केले होते याची आठवण यायला हवी होती. मात्र, आता कोणत्याही निवडणुका नाहीत. तरीही किमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे स्मरण ठेवायला हवे, असा टोला राऊत यांनी लगावला.
