Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

भारतातील सीएसआर परिसंस्थेला सहकार्याधारित, प्रणालीबद्ध, परिणामकारक मॉडेलकडे वळण्याची आवश्यकता    

पुणे : भारतातील सीएसआर परिसंस्थेने स्वतंत्र व विखुरलेल्या उपक्रमापासून दूर जात सहकार्याधारित, प्रणालीबद्ध आणि परिणामकारक मॉडेलकडे वळणे अत्यावश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी व्यक्त केले. निमित्त होते नुकत्याच पुण्यातील यशदा येथे समर्थ भारत या स्वयंसेवी गटाच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या समर्थ भारत सीएसआर कनेक्ट २.० या परिसंवादाचे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, सुहाना स्पायसेसच्या टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन विभागाचे संचालक आणि द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद राजकुमार चोरडिया, समर्थ भारतचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सदर परिसंवादासाठी ७० हून अधिक कॉर्पोरेट प्रतिनिधी, तब्बल १० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उ‌द्योजक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच कंपन्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) ही केवळ कायदेशीर पालनापुरती मर्यादित न ठेवता, दीर्घकालीन, परिणामकारक आणि सहकार्याधारित उपक्रमां‌द्वारे ती प्रभावीपणे कशी राबवता येईल, यावर सखोल चर्चा घडवणे हा या परिसंवादाचा उ‌द्देश होता.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सामाजिक कार्य हे केवळ प्रकल्पापुरते मर्यादित नसून आयुष्यभराची बांधिलकी असल्याचे अधोरेखित केले. आपल्या दीर्घकालीन सामाजिक अनुभवाच्या आधारे प्रभुणे यांनी सामाजिक बदलासाठी औपचारिक शिक्षणापेक्षा व्यक्तीची निष्ठा, सातत्य आणि हेतू अधिक महत्वाचे ठरतात असे नमूद केले. तंत्रज्ञानाचा समाजहितासाठी जबाबदारीने वापर कसा करावा, यावरही प्रभुणे यांनी मार्गदर्शन केले.

आनंद चोरडिया यांनी उ‌द्योग क्षेत्रातील नवोन्मेष, नैतिकता आणि शाश्वतता यांमधील परस्परसंबंध स्पष्ट केला. स्वच्छ, हरित भारत घडवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उद्योग व समाज यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा, शेतकरी, शैक्षणिक संस्था, कंपनी परिसर व समाज म्हणून घनकचरा व्यवस्थापन, आपला कचरा आपण जिरवणे, त्याची विल्हेवाट लावणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे याची त्यांनी प्रत्यक्षात आणलेली मॉडेल व संकल्पना शाश्वत विकास उ‌द्दिष्टे समोर ठेऊन उदाहरणां‌द्वारे मांडली.

चर्चासत्रांवेळी सीएसआर अंमलबजावणीतील तुकड्या-तुकड्‌यामध्ये होणारे प्रयत्न, अल्पकालीन उपक्रमांवर असलेला भर, तसेच विश्वासार्ह एनजीओ भागीदार शोधण्यातील अडचणी या मु‌द्द्‌यांवर सविस्तर चर्चा केल्या गेली. कामाचा परिणाम मोजताना केवळ ‘आउटपुट वर भर न देता आउटकम आणि दीर्घकालीन इम्पॅक्ट म्हणजेच ज्या समाजघटकांसाठी काम करत आहोत त्यामध्ये सामाजिक आर्थिक पर्यावरणीय बदल काय घडला यांचा स्पष्ट फरक करणे आवश्यक असल्याचे चर्चेत अधोरेखित करण्यात आले व त्यासाठी पुरेसा कालावधी संस्थांना देण्यात यावा असेही स्पष्ट मत मांडल्या गेले. तसेच सीएसआर प्रकल्पांसाठी नियोजित एक्झिट प्लॅन असणेही तितकेच महत्वाचे असल्याचे मतही तज्ज्ञांनी यावेळी मांडले.

सीएसआर संदर्भातील नियामक चौकट, सामाजिक स्टॉक एक्सचेंजसारख्या उपक्रमांची भूमिका, तसेच कायदा व नियमपालनाला मर्यादा न मानता पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्याचे साधन म्हणून पाहण्याची गरज यावरही परिसंवादादरम्यान विचारमंथन झाले.

समर्थ भारतच्या वतीने कॉर्पोरेट संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिक यांना जोडणारे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली भूमिका अधोरेखित करत, राष्ट्रीय प्राधान्ये आणि स्थानिक गरजानुसार सीएसआर उपक्रमांची रचना व अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

समर्थ भारत हे एक स्वयंसेवकाधारित व्यासपीठ असून, कॉर्पोरेट संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिक यांना एकत्र आणून संरचित सीएसआर अंमलबजावणी, विश्वासार्ह भागीदारी आणि शाश्वत सामाजिक परिणाम साध्य करण्यासाठी कार्य करते, अशी माहिती समर्थ भारत समूहाचे  सदस्य असलेल्या निवृती साने यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading