सकाळच्या रागांची मंत्रमुग्ध करणारी प्रचीती
गानसरस्वती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आनंद भाटे आणि विदुषी पद्मा तळवलकर यांचे प्रभावी सादरीकरण
पुणे : सकाळच्या प्रसन्न वातावरणात रंगलेले रामकली, मिया की तोडी, बिलासखानी तोडी, ललितागौरी…असे सुरेल रागस्वर रसिकांनी अनुभवले. प्रसिद्ध गायक आनंद भाटे आणि विदुषी पद्मा तळवलकर यांच्या अप्रतिम गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गानसरस्वती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेले नाट्यसंपदा प्रतिष्ठान हे या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सदर महोत्सव संपन्न होत आहे.
आनंद भाटे यांनी राग रामकलीने सुरवात केली. विलंबित एकतालातील ‘दरबार दाऊ पाऊ मनकी मुराद…’ या बंदिशीच्या माध्यमातून रागरूप रसिकांसमोर आणले. अतिशय शांत, धीरगंभीर अशा त्यांच्या सादरीकरणाने स्वरमंडपात वेगळेच वातावरण निर्माण केले. पाठोपाठ ‘सगरी रैन के जागे…’ या द्रुत त्रितालातील बंदिशीतून आनंद यांनी लयकारीवरील त्यांचे प्रभुत्व दर्शवले. त्यानंतर राग मिया की तोडीमध्ये तीनतालातील ‘एरी माई, आज शुभमंगल गावो…’, ही रचना सादर केली. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ आणि ‘माझे माहेर पंढरी’, असे गुरू भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गाजवलेले अभंग सादर करून त्यांनी मंडपात भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण केले. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), माऊली टाकळकर (टाळ), आशिष राणवे व ललित देशपांडे (तानपुरा) यांनी साथ केली.
किशोरीताईंना आदरांजली अर्पण करताना आनंद भाटे म्हणाले, “किशोरी ताईंसारखे महान कलावंत खऱ्या अर्थाने उच्च प्रतीचे गाणे सादर करत. आपण त्यांना गानसरस्वती म्हणतो, ते अगदी यथार्थ आहे. शास्त्रीय संगीताचा मूळ गाभा, पावित्र्य कायम ठेवून स्वप्रतिभेने ज्यांनी संगीताचा विस्तार केला, अशा कलावंतांमध्ये ताईंचे नाव अग्रक्रमावर आहे. घराणेदार गायकीसह त्यांनी जे जे संगीत प्रकार गायिले, त्यांचे सोने केले.”
सकाळच्या सत्राची सांगता जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांच्या गायनाने झाली. बिलासखानी तोडी रागातील ‘नीके घुंघरिया…’ या विलंबित तीनतालात निबद्ध बंदिशीने त्यांनी सुरवात केली. शांत, संयमित आलापचारीतून रागरूप पुढे आणत पद्माताईंनी परिपक्व गायकीचा प्रत्यय दिला. पाठोपाठ गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ‘कोयी आन मिलावो मोहन श्याम…’, या बंदिशीतून त्यांनी ताईंना जणु आदरांजली अर्पण केली. नंतर राग ललितागौरीमधील ‘प्रीतम सैय्या…’ (विलंबित तीनताल) आणि ‘काऊ कोवू मानत नाही…’ (द्रुत त्रिताल) या रचना ऐकवत रसिकांना तृप्त केले. ‘तोरे दामनवा लगी महाराज…’, ही भक्तिरसपूर्ण ठुमरी अंगाची रचना (ही रचना विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी किशोरीताईंना शिकवली होती. किशोरीताईंनी ती पद्माताईंना शिकवली) सादर करून पद्माताईंनी सकाळच्या सत्राची सांगता केली. त्यांना तेजस माजगावकर (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अंकिता दामले, अमृता चौधरी आणि रसिका गरूड यांनी तानपुरा व स्वरसाथ केली. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
