Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

बासरीचे हळुवार स्वर आणि परिपक्व सादरीकरण रंगले

 गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सांगता

पुणे : रसिकप्रिय वादक राकेश चौरसिया यांनी बासरीवादनातून उभा केलेला राग मारुबिहाग आणि ज्येष्ठ गायक पं. वेंकटेश कुमार यांच्या परिपक्व गायनातून साकारलेला राग कौंसी कानडा, यामुळे गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरेल सांगता झाली.

गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या ‘गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या पूर्वार्धात ग्रॅमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांचे रंगतदार बासरीवादन रसिकांची दाद मिळवून गेले. “हे व्यासपीठ आदरणीय किशोरीताईंचे आहे. त्यांच्या दर्शनाची संधी अनेकदा लाभली. नकळत्या वयात एकदा मी त्यांच्यासमोर भूपाली (भूप राग) वाजवला होता. ताईंच्या भूपने काय योगदान दिले आहे, हे नंतर समजले. पण तेव्हा ‘ अच्छा बजाया रे’ असे त्यांनी माझे कौतुकच केले होते. ताईंच्या भूपालीसमोर माझा भूपाली बिलकुल नेपाली लग रहा था…” अशी आठवण राकेश चौरसिया यांनी जागवली आणि समयानुकूल असा राग मारुबिहाग सादर केला.

अतिशय हळुवार आलापीतून त्यांनी वातावरण निर्मिती केली. त्यांची अनिबद्ध आलापी अतिशय श्रवणीय होती. आलाप,  जोड, झाला अशा क्रमाने त्यांनी रागरूप उलगडत नेले. एक मध्यलय रचना या रागात ऐकवून त्यांनी लयकारीचेही दर्शन घडवले. त्यानंतर राग भिन्न षड्ज मध्ये एकतालातील आणि त्रितालातील रचना पेश केल्या. शेवटी रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी पहाडी धून सादर करून विराम घेतला. त्यांना ओजस अढिया यांनी तबल्यावर अप्रतिम साथ केली. विशेषत: लयकारी सुरू झाल्यावर तबलासाथ उत्तरोत्तर रंगत गेली.

पहिल्या दिवसाचा समारोप पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांच्या गायनाने झाला. राग कौंसी कानडा मध्ये त्यांनी ‘राजन के सिरताज’ ही बंदिश तिलवाडा तालात पेश केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम), मच्छिंद्र बुवा, कैवल्य पाटील (तानपुरा) यांनी पूरक साथसंगत केली. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading