Wednesday, August 5, 2026
Latest NewsPUNE

कलेचा वारसा जपणारे आश्वासक सादरीकरण ; १२ व्या गानसरस्वती महोत्सवाची दिमाखदार सुरुवात

 

गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांना गायन- वादनांतून आदरांजली

पुणे : घराण्याकडून लाभलेला कलेचा वारसा नव्या पिढीने कसा आपलासा केला आहे, याचे उत्तम दर्शन गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या सत्रात रसिकांना घडले. युवा गायिका तेजश्री आमोणकर, सतारवादक भूपाल पणशीकर आणि गायक भुवनेश कोमकली या तीनही कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून आश्वासक प्रचीती दिली.

गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गानसरस्वती महोत्सवाची शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) रोजी दिमाखदार सुरुवात झाली. प्रारंभी वेदमूर्ती वरदेंद्र श्रीपाद जोशी आणि वेदमूर्ती जयदीप प्रसाद जोशी यांनी वेदमंत्रपठण करून आशीर्वचन दिले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि अपर्णा पणशीकर यांनी वेदमूर्तींचा सन्मान केला.

ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेले नाट्यसंपदा प्रतिष्ठान हे या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान सदर महोत्सव संपन्न होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आणि गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या शिष्या व नात असलेल्या तेजश्री आमोणकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी जयपूर घराण्याचा खास मानला जाणारा राग ललितागौरी सादर केला. विलंबित तीनतालात ‘प्रीतम सैय्या…’ या प्रसिद्ध बंदिशीच्या माध्यमातून तेजश्री यांनी रागरूप मांडले. त्यानंतर राग कामोदमध्ये मध्यलय एकतालात त्यांनी ‘लागी रे मोरी नई लगन…’ ही रचना ऐकवली. रसिकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “माझ्या आजीच्या नावाच्या या व्यासपीठावर मी प्रथमच गायन करत आहे. रघुदादांनी ही संधी मला दिली त्याबद्दल मी आभारी आहे.” त्यावर बोलताना पं. रघुनंदन पणशीकर म्हणाले, “हे व्यासपीठ गुरू किशोरीताईंचे आहे आणि आज त्यांची नात तेजश्रीचे गायन याच व्यासपीठावर सादर होणे, हा आनंदाचा भाग आहे.” तेजश्री यांना यती भागवत (तबला), ज्ञानेश्वर सोनवणे (संवादिनी), तसेच वनिता तांबोसकर आणि अभिषेक तांबिरे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

यानंतर पं. दिनकर पणशीकर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक भूपाल पणशीकर यांचे सतारवादन रंगले. त्यांनी राग पूरिया छेडला. आलाप, जोड, झाला या क्रमाने रागविस्तार करत, त्यांनी अगदी मोजक्या वेळात राग खुलवला. पाठोपाठ त्यांच्या सतारीच्या झंकारांतून साकारलेल्या मिश्र खमाजमधील दादरा तालातील धून रसिकांचा ठाव घेणारी ठरली. त्यांना तबल्यावर पं. रामदास पळसुले यांनी वादन खुलवणारी साथ केली. अमृता चौधरी यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

पंडित कुमार गंधर्व यांचे नातू व पं. मुकुल शिवपुत्र यांचे सुपुत्र असलेले प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांनी राग केदार पेश केला. घराणेदार गायकीची तालीम, रियाजी आवाज आणि प्रतिभासंपन्न आशयाने युक्त असे भुवनेश यांचे गायन होते. त्यांना आशय कुलकर्णी (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच ओंकार अलम आणि गणेश यांनी तानपुऱ्यावर साथ केली. विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading