Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

मुठा नदी संवर्धनासाठी ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ उपक्रम शनिवारी

पुणे – मुठा नदीच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वर्शिप अर्थ फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणारा ‘माय रिव्हर माय व्हॅलेंटाइन’ हा उपक्रम दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भिडे पूल परिसर, नवी पेठ,मुठा नदी पात्र येथे राबविण्यात येणार आहे. यंदा उपक्रमाचे ६ वे वर्ष असून भव्य नदी स्वच्छता मोहीम व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला फाऊंडेशनचे दिनेश कदम, आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, पीआयबीचे मीडिया अँड कम्युनिकेशन ऑफिसर हर्षल अकुडे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षणा कांबळे, हार्दिक सोनावणे, चैतन्य गर्जे, दुर्गेश बालके आदी उपस्थित होते.

आम्रपाली चव्हाण म्हणाल्या, हा उपक्रम पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सीबीसी – सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (भारत सरकार), एनएसएस विभाग तसेच ‘माय भारत’ – युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

दिनेश कदम म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी केवळ एकदिवसीय मोहिमा पुरेशा नाहीत. म्हणूनच आम्ही शिपको कंपनीच्या सहकार्याने मुठा नदीमध्ये ‘ट्रॅश बूम’ ही शाश्वत व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे नदीत वाहून येणारा प्लास्टिक कचरा, निर्माल्य, फुले, नारळ तसेच इतर तरंगणारा कचरा अडवून त्याचे नियोजनबद्ध संकलन करता येते. ‘ट्रॅश बूम’ ही नदी स्वच्छतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना असून, यामुळे नदीचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपले जाईल.

समीर पौलस्ते म्हणाले, मागील वर्षांमध्ये विविध संस्थांच्या सक्रिय सहभागामुळे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात कोरडा कचरा संकलित करण्यात यश आले असून, नागरिकांमध्ये नदी संवर्धनाबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी नदी स्वच्छता मोहीम, रील्स स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण जपण्याचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading