‘… म्हणून मुख्यमंत्र्यांना करावी लागते अमित शहा यांच्याशी चर्चा’
शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका
मुंबई प्रतिनिधी
राज्यात दोन पक्ष सत्तेत सहभागी आहेत. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे दोन्ही पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्थापन केले आहेत. त्यामुळे राज्य कारभार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहा यांच्याशी चर्चा करावी लागते, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
विधानसभा निवडणुकीतील विजयापाठोपाठ राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये महायुतीने उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली येथे रवाना झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी काल रात्री सुमारे तासभर सविस्तर चर्चा केली. या चर्चेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत बोलत होते.
अमित शहा केंद्रीय गृहमंत्री असले, भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या पक्षाचे संस्थापक आणि नेते अमित शहा हेच आहेत. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे सरकार चालवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा यांच्याशी चर्चा करणे भाग पडते, असे राऊत म्हणाले.
महायुतीमध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेला व राज्यात सत्तेत सहभागी असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलीनीकरणाबाबत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी जोपर्यंत विलीनीकरणाबाबत अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस काही बोलत नाहीत तोपर्यंत आपण काय प्रतिक्रिया देणार, असा सवाल केला.
चंद्रपूर येथे काँग्रेसच्या दोन गटातच सत्ता स्थापनेसाठी साठमारी सुरू असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सत्ता स्थापनेसाठी महापौर पद विभागून घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत होईल असे कृत्य आपल्या पक्षाकडून घडणार नाही. चंद्रपूर मधील स्थानिक नगरसेवकांना याबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
