अल्बानिया देश ठरला IIHM च्या इंटरनॅशनल यंग शेफ ऑलिम्पियाड २०२६ चा जागतिक विजेता
पुणे : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) संस्थेचे जागतिक मुख्यालय असलेल्या कोलकत्ता येते १२ व्या IIHM इंटरनॅशनल यंग शेफ ऑलिम्पियाड (YCO) २०२६ चा भव्य समारोप पार पडला. जगभरातील तरुण शेफ्सच्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यंदाचे पर्व कोलकात्यात यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी शेफ्सच्या मंचावर, कोलकात्याशी भावनिक नाते असलेल्या मदर तेरेसांच्या जन्मदेशातून आलेल्या अल्बानियाच्या तरुण शेफने इतिहास घडवला. इन्स्टिट्यूटी कुलिनारी नेरान्झी येथील एन्ऱी क्युडारी याने सुवर्ण चषक उंचावत सुवर्ण मुकुट परिधान केले आणि जागतिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत जगातील सर्वाधिक तरुण शेफ्स सहभागी झाले होते.
तसेच या मालिकेमध्ये इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर राहिला. वेस्टमिन्स्टर कॅपिटल सिटी कॉलेज येथील डॉमिनिक थॉमस ग्रंडी याला रौप्य चषक प्रदान करण्यात आले.
श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कोलंबो अकॅडमी ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट येथील विदानागामागे रुमिरा रेशान पियासिरी याने कांस्य चषक पटकावला. पुण्यात झालेल्या ऑलिम्पियाडच्या पहिल्या फेरीतील दमदार कामगिरीमुळे त्याचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अधिक भक्कम ठरला.
जगप्रसिद्ध पाककला परंपरा लाभलेल्या फ्रान्सच्या मेलिस हेलिन पॅरॉट हिने प्लेट ट्रॉफी जिंकली.
डॉ. सुबोर्णो बोस चॅलेंज ट्रॉफी, दोन देशांतील शेफ्सना एकत्र येऊन एकच पदार्थ तयार करण्याची संधी देणाऱ्या आणि पाककलेचे माध्यमातून एकतेचा संदेश देणाऱ्या भावस्पर्शी स्पर्धेत, उझबेकिस्तानचा ओझोदबेक ओदिलॉव आणि तिमोर-लेस्तेचा मेलक्विरुडी लेकी-बेरे दा कुन्हा यांनी विजेतेपद पटकावले.
कोलकात्याच्या स्वच्छ रात्रीच्या आकाशाखाली, भावना, शिस्त आणि साकार झालेल्या स्वप्नांनी भारलेल्या क्षणांत सर्व स्पर्धकांनी यशाच्या शिखरावर झेप घेतली. ते केवळ विजेते म्हणून नव्हे, तर जागतिक पाककला नेतृत्वाच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून उभे राहिले. जगातील सर्वाधिक सहयोगात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पाककला स्पर्धा म्हणून ओळख मिळवलेल्या या स्पर्धेत प्रत्येक विजेता आपल्या यशाचा खरा हकदार ठरला.
अंतिम स्पर्धात्मक फेऱ्या कोलकत्ता येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) ग्लोबल कॅम्पसमध्ये पार पडली. त्यानंतर निक्को पार्क संकुलातील वेट-ओ-वाइल्ड येथे भव्य समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. संगीत, नृत्य आणि उत्सवाच्या वातावरणात जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी शेफ्स स्पर्धेचा समारोप झाला.
टॉप 10 अंतिम स्पर्धकांमध्ये
जोमार टी. बर्नार्डो (फिलिपिन्स), विदानागामागे रुमिरा रेशान पियासिरी (श्रीलंका), आव्ही ङ शी चुआन (मलेशिया), कोटमसेट्टी सत्य तेजा (भारत), रोहन छेत्री (नेपाळ), डॉमिनिक थॉमस ग्रंडी (इंग्लंड), जॉर्जिओस आयओनिस (स्वीडन), एम्मा गिसेल बायरो (कॅनडा), एन्ऱी क्युडारी (अल्बानिया) आणि अनन्या मदान (स्वित्झर्लंड) यांचा समावेश होता. कौशल्य, प्रामाणिकपणा आणि परंपरा व नवकल्पनांप्रती असलेल्या आदराच्या जोरावर त्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले.
यंग शेफ ऑलिम्पियाड (YCO) २०२६ चा पडदा पडताना ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता, एक जागतिक ज्ञान आणि शिक्षण परिसंस्था म्हणून पुढे आली. तंत्रज्ञान, नैतिकता, शाश्वतता आणि मानवी सर्जनशीलतेचा सुंदर संगम या मंचावर अनुभवता आली. “आर्टीफिशीअल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून जागतिक पाककला वारसा जतन करणे” ही संकल्पना स्वयंपाकघरांपासून चर्चांपर्यंत आणि विविध संस्कृतींमध्ये प्रत्यक्षात साकार झाली.
या ऑलिम्पियाडच्या दृष्टीकोनावर बोलताना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) चे संस्थापक-अध्यक्ष आणि यंग शेफ ऑलिम्पियाड (YCO) चे मुख्य मार्गदर्शक डॉ. सुबोर्णो बोस म्हणाले, “तुम्ही वेगवेगळ्या खंडांतून, संस्कृतींतून, हवामानांतून आणि खाद्यपरंपरांतून येथे आला होतात; मात्र तुम्ही एका मंचावर उभे राहिलात—एका समान भाषेने एकत्र आलेले, आणि ती भाषा म्हणजेच अन्न.”
