Monday, May 25, 2026
Latest NewsSports

पुण्यातील ई-स्पोर्ट्स खेळाडूंमध्ये करिअरबाबत आत्मविश्वास

पुणे : जेटसिंथेसिस X YouGov इंडियन ई-स्पोर्ट्स अहवालानुसार भारतातील ई-स्पोर्ट्स परिसंस्था एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे. ई-स्पोर्ट्स खेळाडूंच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, ई-स्पोर्ट्सकडे एक गंभीर खेळ म्हणून पाहिले जाणे आणि दीर्घकालीन करिअर पर्याय म्हणून त्याचा वाढता विचार करणे हे या बदलाचे प्रमुख संकेत आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल आहे.

पुण्यामध्ये ई-स्पोर्ट्स करिअरबाबत उच्च आत्मविश्वास

पुण्यात ई-स्पोर्ट्सकडे दीर्घकालीन करिअर म्हणून पाहण्याबाबतचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या मजबूत आहे. पुण्यातील दररोज ई-स्पोर्ट्स खेळणाऱ्या 78% खेळाडूंना ई-स्पोर्ट्स हे आर्थिकदृष्ट्या सक्षम करिअर वाटते. यापैकी 49% जणांनी ते अतिशय सक्षम असल्याचे नमूद केले आहे. हा आत्मविश्वास प्रत्यक्ष उद्देशातही रूपांतरित होत असून, पुण्यातील 68% ई-स्पोर्ट्स खेळाडूंनी व्यावसायिक पातळीवर ई-स्पोर्ट्स करिअर करण्याचा विचार केल्याचे सांगितले आहे. यामुळे या परिसंस्थेमध्ये दीर्घकालीन करिअरबाबतचे गांभीर्य वाढत असल्याचे दिसून येते.

करिअरची महत्त्वाकांक्षा केवळ स्पर्धात्मक खेळापुरती मर्यादित नाही

पुण्यातील ई-स्पोर्ट्स खेळाडू परिसंस्थेच्या व्यापकतेबाबतही परिपक्व समज दर्शवत आहेत. 64% खेळाडू स्पर्धात्मक खेळाडू होण्याची इच्छा व्यक्त करत असले, तरीही मूल्यसाखळीतील विविध भूमिकांमध्ये त्यांना रस असल्याचे दिसून येते. 54% जण स्ट्रीमिंग किंवा कंटेंट म्हणजेच आशय निर्मिती करू इच्छितात, 33% प्रशिक्षणामध्ये रस दाखवत आहेत, 35% संघ व्यवस्थापन किंवा कार्यक्रम आयोजनामध्ये, तर 27% जण ई-स्पोर्ट्स पत्रकारिता किंवा समालोचन (कॉमेंट्री) यांसारख्या भूमिकांमध्ये करिअर करू इच्छितात. यामुळे ई-स्पोर्ट्सकडे केवळ एकाच मार्गाचा नव्हे, तर बहुआयामी उद्योग म्हणून पाहिले जात असल्याचे स्पष्ट होते.

महत्त्वाकांक्षा खरी आहे, पण रचना अजून विकसित होत आहे

ई-स्पोर्ट्स परिसंस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी काय आवश्यक आहे असे विचारले असता पुण्यातील खेळाडूंनी सातत्याने दीर्घकालीन सक्षम करणाऱ्या घटकांकडे लक्ष वेधले. 92% प्रतिसादकांनी सरकारी मान्यता आणि नियमन महत्त्वाचे असल्याचे सांगितले, तर 92% जणांनी व्हिडिओ गेमिंग कॅफे आणि अरेनासारख्या पायाभूत सुविधांची गरज अधोरेखित केली. सुसूत्र मार्गदर्शनालाही प्राधान्य देण्यात आले असून पुण्यातील 89% प्रतिसादकांनी करिअर काउन्सेलिंग आणि मेंटॉरशिप मार्ग अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. कुटुंबाचा पाठिंबा, समाजाचा दृष्टीकोन आणि व्यापक सामाजिक स्वीकार यासंबंधीची आव्हाने अद्यापही गंभीर असून 82% प्रतिसादकांनी या बाबींना त्यांच्या प्रमुख तीन चिंतांमध्ये स्थान दिले आहे.

संस्थात्मक स्वीकार हा एक महत्त्वाचा आधार मानला जात असून, 83% प्रतिसादकांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये ई-स्पोर्ट्सचा समावेश महत्त्वाचा असल्याचे सांगितले. खासगी क्षेत्राकडून असलेल्या अपेक्षाही तितक्याच ठळक आहेत. 93% जणांनी ब्रँड्सकडून प्रायोजकत्व महत्त्वाचे असल्याचे सांगितले, तर 91% जणांनी शिष्यवृत्ती तर 83% नी प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रशिक्षण अकॅडमीज या शाश्वत ई-स्पोर्ट्स करिअरसाठी महत्त्वाच्या असल्याचे अधोरेखित केले.

पुण्यामध्ये ई-स्पोर्ट्सकडे मोठ्या प्रमाणात खेळ म्हणून पाहिले जात आहे

पुण्यामध्ये ई-स्पोर्ट्सकडे आता स्पष्टपणे क्रीडा दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. शहरातील दररोज ई-स्पोर्ट्स खेळणाऱ्या 63% खेळाडूंना ई-स्पोर्ट्स हे शारीरिक खेळ आणि बुद्धिबळासारख्या मानसिक शिस्तीच्या खेळांप्रमाणेच वाटते. यातही या खेळांमध्ये आवश्यक असलेली शिस्त, तयारी आणि कामगिरी असावी लागते.

हा बदललेला दृष्टिकोन खेळाडूंच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टीकोनालाही आकार देत आहे. पुण्यातील 64% ई-स्पोर्ट्स खेळाडूंनी व्यावसायिक ई-स्पोर्ट्स खेळाडूंना “अ‍ॅथलीट्स” म्हणून संबोधण्यात त्यांना सहजता वाटते असे सांगितले, तर 58% जणांनी आपण स्वतःलाही खेळाडू म्हणून ओळखतो असे म्हटले आहे. यावरून भारतीय ई-स्पोर्ट्स खेळाडूंमध्ये स्वतःविषयीच्या प्रतिमेतील हा बदल सक्रियपणे सुरू असल्याचे दिसते.

स्पर्धात्मक, कार्यक्षम परिसंस्था

स्पर्धात्मक व्हिडिओ गेमिंगचा सातत्यपूर्ण अनुभव पुण्यातील ई-स्पोर्ट्स खेळाडूंमध्ये विकसित होणाऱ्या क्षमतांविषयीच्या धारणा घडवत आहे. 90% जण व्यावसायिक ई-स्पोर्ट्सला धोरणात्मक विचार व नियोजन, अनुकूलता, प्रतिक्रिया क्षमता, हात–डोळा समन्वय आणि दबावाखाली जलद निर्णय घेणे यांसारख्या क्षमतांशी जोडतात आणि त्यांच्या प्रमुख पाच क्षमतांमध्ये समाविष्ट करतात. खेळापलीकडे जात 73% जणांनी शिस्त, गंभीर सराव, लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता या गोष्टींचा ई-स्पोर्ट्समधून विकसित होणाऱ्या प्रमुख क्षमतांमध्ये समावेश केला तर 61% जणांनी समस्या सोडवण्याची क्षमता, मानसिक लवचिकता आणि कणखरपणा यांचा उल्लेख केला.

या निष्कर्षांवर प्रतिक्रिया देताना जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवानी म्हणाले, “हा संशोधन अभ्यास भारतातील ई-स्पोर्ट्ससाठी एका निर्णायक क्षणाचे चित्रण करतो. भारतीय ई-स्पोर्ट्स खेळाडू भविष्यासंदर्भात ज्या स्पष्टतेने विचार करत आहेत, ती विशेष बाब आहे. केवळ संधीच्या दृष्टीनेच नव्हे, तर दीर्घकालीन टिकून राहण्याच्या दृष्टीनेही ते विचार करत आहेत. पुढील टप्प्यातील वाढ टिकाऊ मार्ग, विश्वासार्ह संस्था आणि सहाय्यक यंत्रणा उभारण्याबाबत असली पाहिजे. त्यामुळे प्रतिभेला शाश्वत पद्धतीने प्रगती करता येईल. याच मार्गाने भारत जागतिक ई-स्पोर्ट्समध्ये सहभागातून नेतृत्वाकडे वाटचाल करेल.”

पुण्यातील प्रेक्षक खेळप्रेमींप्रमाणे वागत आहेत

शहरातील वापराच्या पद्धतीदेखील ई-स्पोर्ट्सच्या वाढत्या क्रीडात्मक दर्जाला अधोरेखित करतात. पुण्यातील 91% ई-स्पोर्ट्स खेळाडूंनी महिन्यातून किमान एक ते दोन वेळा ई-स्पोर्ट्स स्पर्धा किंवा लीग पाहतो असे सांगितले. ही नियमित प्रेक्षकसंख्या BGMI मोबाईल इंडिया सिरीज, ई-स्पोर्ट्स एशियन गेम्स आणि ग्लोबल ईक्रिकेट प्रीमियर लीग यांसारख्या प्रमुख स्पर्धांबाबतच्या जागरूकतेसोबत दिसून येते. 84% प्रतिसादकांनी या पैकी किमान एका कार्यक्रमाची माहिती असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading