राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख ह्यांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का
सातारा – सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करत सत्ताधाऱ्यांना हादरा दिला आहे.
माण-खटाव मतदारसंघातील एकूण ९ जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल ५ गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे आणि भावजय भारती अंकुश गोरे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे हा निकाल केवळ निवडणूक पराभव न राहता, गोरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक प्रश्न, शेतकरी, पाणीटंचाई, विकासकामांचा अभाव आणि ग्रामपातळीवरील नाराजी या मुद्द्यांवर प्रभावी प्रचार केला. त्याचा थेट परिणाम मतपेटीत दिसून आला. मतदारांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कौल दिला आहे.
या निकालामुळे माण-खटाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
