तीन दिवसीय भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचा दिमाखात समारोप
पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जयंती दिनी आज तीन दिवस पुण्यात संपन्न होत असलेल्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचा दिमाखात समारोप झाला. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे सदर महोत्सव गेले तीन दिवस सुरु होता आणि त्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता.
आज महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात आळंदी येथील रामकृष्ण आध्यात्मिक संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या पखवाज वादनाने झाली. या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वादनाला उपस्थितांनी देखील दाद दिली. यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे मानकरी असलेले अविनाश पाटील व अनिल सर्जे यांचे एकल तबला वादन रंगले. अनिल सर्जे यांनी तीनतालात कायदा, रेला, त्यांचे प्रकार, गत, मुखडा आणि चक्रधर यांचे बहारदार सादारीकरण केले. त्यांना सुधीर टेकाळे यांनी संवादिनीवर पूरक साथ केली. तर अविनाश पाटील व त्यांच्या शिष्यांनी देखील यांनी तीनताल वाजवला. यामध्ये त्यांनी कायदा, रेला, तुकडे, परण, गत, उठाण यांचे प्रस्तुतीकरण केले. सुधीर टेकाळे यांनी त्यांना संवादिनीवर साथसंगत केली.
आश्वासक गायक असलेल्या श्रीनिवास केंचे यांचे गायन यानंतर रंगले. त्यांनी राग वाचस्पती गायला. यामध्ये त्यांनी ‘राखो मोरी लाज…’ हा विलंबित एक तालातील बडा ख्याल तर ‘चतुर सुघर बलमा…’ हा द्रुत तीनतालातील छोटा ख्याल सादर केला. त्यांना ताराशीष बक्षी यांनी तबला तर मालू गांवकर यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
किराणा घराण्याचे गायन अनुभविण्याची संधी यानंतर उपस्थितांना मिळाली. किराणा घराण्याचे गायक पं सुधाकर चव्हाण आणि त्यांची सुकन्या शाश्वती चव्हाण या पिता पुत्रीच्या गायनाचा आस्वाद यावेळी सर्वांनी घेतला. या दोघांनी राग मारु बिहाग गायला. ‘रसिया हो ना जाये…’ ही विलंबित एक तालातील बंदिश आणि ‘कैसे कैसे जाऊ मथुरा नगरी…’ हा छोटा ख्याल त्यांनी सादर केला. ‘अवघा रंग एक झाला…’ या भजनाने त्यांनी समारोप केला. या दोघांना ऋषिकेश जगताप (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), रवी पांचाळ, दिगंबर महाराज, श्रावणी विरोकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. प्रसिद्ध व्हायोलिनवादक विदुषी कला रामनाथ यांच्या सुमधुर व्हायोलिन वादनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा समारोप झाला. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.
