रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात तमाशा महर्षी अशी आपली ओळख निर्माण करणारे रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा सन्मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बदलत्या काळात अनेक आव्हानांना तोंड देऊन तमाशा ही लोककला टिकवून ठेवण्यात व वृद्धिंगत करण्यात रघुवीर खेडकर यांचे मोठे योगदान आहे.
रघुवीर खेडकर यांना लोककलेचा वारसा त्यांच्या आईकडून प्राप्त झाला. महान तमाशा कलावंत कांताबाई सातारकर या त्यांच्या मातोश्री होत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना तमाशा या लोककलेची आवड निर्माण झाली. तमाशातील सोंगाड्या ही व्यक्तिरेखा त्यांनी अजरामर केली.
गावोगावी तमाशा सादर करत अनिश्चिततेचे आयुष्य जगणाऱ्या तमाशा कलावंतांच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तमाशा मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी दीर्घकाळ भूषविले. कोरोना महासाथीच्या काळात मोठ्या संकटात सापडलेल्या तमाशा कलावंतांना दिलासा देण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन रघुवीर खेडकर यांचा अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आता याच कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांची निवड पद्मश्री पुरस्कारासाठी केली आहे.
