चौधरी कुटुंबियांच्या वतीने रुग्णसेवेचे नवे दालन
मंगेशकर रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची भेट
पुणे : लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील त्वचारोग निवारण विभागात, त्वचारोग निदान, उपचार तसेच संशोधनासाठी अत्याधुनिक स्वरुपाची वैद्यकीय उपकरणे नुकतीच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन तसेच चौधरी कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या या वैद्यकीय उपकरणांमुळे भाजलेली त्वचा, टॅटू, काळे डाग, मुरूम, वांग यासह अन्य कारणांमुळे रोगग्रस्त त्वचेवरील अत्याधुनिक उपचार नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने रुग्णांना मिळणे आता शक्य होणार आहे.
मंगेशकर रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी इमारतीच्या मीनाताई चोक्सी सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात मधुभाऊ चौधरी स्मृत्यर्थ त्वचारोग विभाग आणि संशोधन केंद्रासाठी लेझर सेवांचे उद्घाटन तसेच शकुताई मधुकर चौधरी यांच्या स्मृत्यर्थ स्कल बेस न्यूरोसर्जरीसाठी अत्याधुनिक उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी, परिमल चौधरी, सुनंदा निसळ, डॉ. उषा कट्टी, त्वचारोग विभागातील डॉ. प्रद्युम्न वैद्य, डॉ. धनश्री भिडे, डॉ. विनय कुलकर्णी, न्यूरॉलॉजी विभागातील मेंदू शल्यचिकित्सक डॉ. कौस्तुभ दिंडोरकर आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. उत्कांत कुर्लेकर उपस्थित होते.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात महिलांसाठी ‘सेंटर फॉर फिमेल जेनायटल डमॅटॉसिस’ हा अभिनव बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यात महिलांच्या जनेद्रीयांशीसंबंधीत दुर्लक्षित त्वचारोगावर उपचार करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमावेळी बोलताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “त्वचारोग विभाग हा काहीसा दुर्लक्षित दिसतो. या विभागातील तज्ज्ञ डॉ. विनय कुलकर्णी यांनी माझे लक्ष या विभागाकडे वेधले. इथे अधिक लक्ष देण्याची गरज आहे आणि संशोधनाला वाव आहे. त्या संशोधन शब्दाने मी आकर्षित झालो कारण कोणत्याही ठिकाणी संशोधन अत्यावश्यक असते, असे माझे मत आहे. त्वचारोग विभागाने माझ्या म्हणण्याला मान देत, सकारात्मक पावले उचलली. आमची ही मदत कदाचित छोटी असेल, पण ती दिवसेंदिवस रुग्णांसाठी महत्त्वाची आणि उपयुक्त ठरेल. आज माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हे घडत आहे, याचा मला आनंद वाटतो. या विभागासाठी अधिक जागा उपलब्ध करावी, असेही माझे सांगणे आहे आणि एक वर्षाच्या आत ती उपलब्ध केली जाईल, असे प्रशासनाने मान्य केले आहे. आम्ही दिलेली वैद्यकीय उपकरणे प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी सज्ज आहेत, ही देखील आनंदाची बाब आहे. दिवसेंदिवस हा विभाग रुग्णसेवेसाठी अधिकाधिक सुसज्ज होत जाईल, असा विश्वास मला वाटतो.”
परिमल चौधरी म्हणाल्या, “वैद्यकीय क्षेत्रात नेमकी कुठल्या विभागात उपकरणे द्यावीत, हा अवघड प्रश्न होता. कारण प्रत्येक विभाग महत्त्वाचाच आहे. शेवटी दुर्लक्षित व काहीसा उपेक्षित असणारा त्वचारोगविभाग आणि स्त्रियांवरील उपचारांसाठी वैद्यकीय उपकरणांची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि आज तो वास्तवात येत आहे. या उदात्त उपक्रमात सहभागी होता आले आणि समाजसेवेच्या दिशेने अर्थपूर्ण योगदान देण्याची संधी मिळाली, यासाठी आम्ही रुग्णालयाचे ऋणी आहोत. हे केंद्र, तसेच अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणे आणि सुविधा, अनेक गरजू रुग्णांना आरोग्य, आणि नवे आयुष्य प्रदान करतील, असा विश्वास आहे.”
सुनंदा निसळ म्हणाल्या, “चौधरी कुटुंबात देशसेवा, स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाची परंपरा आहे. शिक्षिका आई आणि स्वातंत्र्यसैनिक असणारे वडील, यांच्याकडून देश, समाज, शिक्षण क्षेत्रातील उत्तम कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींना साह्य करण्याचे संस्कार पुढील पिढीत उतरले आहेत. रुग्णालयाला दिलेली वैद्यकीय उपकरणे हा या संस्कारांचाच भाग आहेत.” डॉ. उषा कट्टी यांनीही मनोगत मांडले.
मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने त्वचारोग विभागातील डॉ. प्रद्युम्न वैद्य, डॉ. विनय कुलकर्णी आणि डॉ. धनश्री भिडे यांनी तर न्यूरोलाजी विभागातील मेंदू शल्य चिकित्सक डॉ. कौस्तुभ दिंडोरकर यांनी या वैद्यकीय उपकरणांची सोदाहरण तांत्रिक माहिती दिली. सानिका जोशी यांनी आभार मानले.
