Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

‘ओ.पी. नय्यर – क्या बात है इस जादूगर की…’ लघुपटाचे प्रदर्शन २८ जानेवारी रोजी

 

पुणे : प्रतिभावान संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील अॅड्रॉइट पब्लिकेशन या संस्थेच्या वतीने हेमंत पाकणीकर, रवींद्र केळकर व प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांची निर्मिती असलेल्या ‘ओ. पी. नय्यर – क्या बात है इस जादूगर की…’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. लघुपटाचे हे प्रदर्शन येत्या बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६, संध्याकाळी ६.०० वाजता कोथरूड येथील राजलक्ष्मी कलादर्शन सभागृह या ठिकाणी संपन्न होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

खुद्द ओ.पी. नय्यर यांची त्यांनी वेगवेगळ्या वेळी केलेली भाष्ये, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी नय्यर साहेबांच्या जागवलेल्या आठवणी, त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलेली वैशिष्ट्ये व नय्यर साहेबांच्या उत्साहवर्धक स्वरावलीने नटलेली अनेक गाणी हे या लघुपटाचे वैशिष्ट्य असेल, अशी माहिती सतीश पाकणीकर यांनी दिली.

पावणेदोन तासांच्या या लघुपटात ओ.पी. नय्यर या कलंदर संगीतकाराच्या अनेकविध पैलूंची मनोरंजक अशी सफर रसिक प्रेक्षक करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. नय्यर यांच्या या जन्मशताब्दी वर्षात अॅड्रॉइट पब्लिकेशन या संस्थेच्या वतीने हेमंत पाकणीकर, रवींद्र केळकर व प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी एकूण तीन कार्यक्रमांची निर्मिती केली असून त्यापैकी हा तिसरा कार्यक्रम असेल.

भारतीय सिने-संगीताच्या सुवर्ण युगातील अनेक थोर संगीतकारांच्या स्पर्धेस टक्कर देत व सिने-संगीताला लाभलेल्या असामान्य स्वराचा म्हणजेच ‘लता मंगेशकर’ यांच्या स्वराचा एकदाही वापर न करणारा संगीतकार ही नय्यर साहेबांची ओळख तर होतीच पण स्वतःच्या तत्वांचा आग्रह धरणारा व त्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा एक अत्यंत मानी कलाकार म्हणूनही ते ओळखले गेले. वक्तशीरपणाला अनन्य महत्व देणाऱ्या या कलावंताने आपल्या सहकारी संगीत साथीदारांचा कायम आदर केला. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला त्वरित व रोखीने मिळावा यासाठी हट्ट धरला व तो निभावलाही.

आज सहा-सात दशकांनंतरही त्यांनी दिलेले संगीत आपण ऐकतो त्यावेळी त्यातला ताजेपणा आपल्याला मोहवून टाकतो. म्हणूनच पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा त्यांच्याविषयी म्हणतात – “समीक्षकांनी नय्यरसाहेबांना ‘किंग ऑफ रिदम’ हा किताब बहाल केला होता. पण मला त्यात ‘मेलडी’ ची जोड द्यायची आहे. कारण त्यांच्या संगीतातील मेलडी ही कधी जुनी होणारच नाही. कायम चिरतरुण राहणार आहे. त्या बरोबरच त्यांच्या संगीतातील ‘रोमँटिसिझम’ही! त्यामुळे मी त्यांना – ‘मेलोडिअसली रोमँटिक किंग ऑफ रिदम’ असंच म्हणीन.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading