Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

वसंतोत्सवच्या पहिल्या दिवशी लोकप्रिय चित्रपटगीतांचे जोशपूर्ण सादरीकरण

पुणे : प्रसिद्ध गायक उस्मान मीर आणि त्यांचे गायक पुत्र आमीर मीर यांच्या बॉलिवुडच्या लोकप्रिय गीतांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वसंतोत्सवाच्या १९ व्या पर्वाचा आज प्रारंभ झाला.

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वसंतोत्सवाचे औपचारिक उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त बापूसाहेब देशपांडे, युगम् रिॲलिटीचे संकेत कण्हेकर, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे संचालक अतुल अष्टेकर,  काकडे फार्म्सचे जय सूर्यकांत काकडे, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे हा महोत्सव संपन्न होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रसिध्द गायक राहुल देशपांडे यांच्या पुढाकारातून होणाऱ्या वसंतोत्सवचे हे १९ वर्ष असून तीनही दिवस सायं. ५:३० ते रात्री १० दरम्यान महोत्सव संपन्न होईल.

गायक उस्मान मीर यांनी सुरवातीला रसिकांशी संवाद साधला. पुणे ही सुरीली भूमी आहे. कलेतील अनेक गुणीजनांमुळे पुण्याची भूमी पवित्र बनली आहे. अतिशय जाणकार असे रसिक इथे आहेत. त्यांच्यासमोर कलेच्या सादरीकरणाची संधी, हे सौभाग्य आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यांनी गायलेल्या ‘आयो शरण तिहारे…’ या भजनाने मीर पितापुत्रांनी मैफलीची सुरुवात केली. त्यापाठोपाठ ‘मितवा…’(कल हो ना हो), ‘तेरे नैना…’(माय नेम इज खान), ‘बुलाया…’(सुलतान), ‘ये तूने क्या किया…’ (वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई), ‘सजदा…’(माय नेम इज खान), ‘पधारो म्हारे देस… सकल मन…’ (हिरामंडी), ‘आया तेरे दर पर…’ (वीर जारा), ‘गरज गरज…’ (संगीत- शंकर एहसान लॉय) अशा अनेक गाजलेल्या रचनांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यांना ईर्शाद मीर (ऑक्टोपॅड), हरून मीर, अब्दुल मीर (तबला), नसीर मीर (बॅजो), चंदन वाघेला (सिंथेसायजर), युसुफ मीर (साईड र्हीदम) यांनी साथसंगत केली.

उत्तरार्धात संगीत नाटकांचा समृद्ध इतिहास मांडणाऱ्या ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे सादरीकरण राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे आणि अमेय वाघ यांनी केले.  सीतास्वयंवर या आद्य नाटकातील पदांना राहुल देशपांडे यांनी दिलेल्या चाली ऐकण्याची संधीही या निमित्ताने रसिकांना मिळाली. ‘पंचतुंड नररुंड मालधर…’ या नांदीने सुरू झालेल्या या प्रयोगाने रसिकांना खिळवून ठेवले. ‘शाकुंतल’, ‘ सौभद्र’,  ‘मतिविकार’, ‘मानापमान’,  ‘एकच प्याला’, ‘संन्यस्तखड्ग’, ‘मत्स्यगंधा’ आणि ‘कट्यार काळजात घुसली…’ अशा सुवर्णकाळातील अनेक नाट्यपदांचा पुन:प्रत्यय या अभिनव प्रयोगातून रसिकांसमोर आला.

‘सौभद्र’, ‘मानापमान’,  ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकांतील पदे प्रवेशांच्या स्वरूपात सादर झाली. मयुरेश वाघ लिखित ‘जनजनात मनमनात’ या नव्या पदाने या रंगतदार मैफलीची सांगता झाली.

त्यांना निखिल फाटक (तबला), ओंकार इंगवले (तालवाद्य), राहुल गोळे (ऑर्गन), विशाल धुमाळ (की बोर्ड) यांनी अनुरूप साथसंगत केली. दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांचे होते. वसंतोत्सवचे सूत्रसंचालन विघ्नेश जोशी आणि स्नेहल दामले यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading