Sunday, April 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हरलेली निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाची मदत?

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रचार साहित्य न घेता मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेली मुभा ही सत्ताधाऱ्यांना हरलेली निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेली मदत समजायची का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

कोणत्याही निवडणूक प्रचार साहित्याचे वाटप न करता, घोषणा न देता, भाषणे, सर्वांचे आयोजन न करता उमेदवार मतदारांना मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भेटू शकतात, अशी मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. राज ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर टीका केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना प्रचाराचे पत्रक द्यायचे नाही. मात्र, पैसे वाटायचे यासाठी निवडणूक आयोगाने ही मुभा दिली आहे का? हा नियम जर जुनाच असेल तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी या नियमाचे अंमलबजावणी का करण्यात आली नाही, असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी या निमित्ताने उभे केले आहेत.

निवडणूक आयोग रोज नियम बदलत आहे. सरकारला जे हवे ते करू देण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना हवे असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोगाने काही नवीन यंत्रणा, मशीन्स आणली आहे. मात्र, त्याबद्दल राजकीय पक्षांना स्वतःहून काही माहिती देण्याची तसदी घेतलेली नाही. या मशीनाची माहिती मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. मात्र त्यांची कोणतीही दखल आयोगाने घेतलेली नाही, हे देखील राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading