Monday, April 6, 2026
Latest NewsPUNE

आपल्या प्राचीन वारशाला मॉन्युमेंट, म्युझियम असे संबोधू नका – पंकज सक्सेना

 

पुणे  – आपली देवालये या केवळ निर्जीव वास्तू नव्हत्या किंवा वस्तुसंग्रहालयातील फक्त कलावस्तूही नव्हत्या. आपल्या समृद्ध ज्ञानपरंपरा, सांस्कृतिक – सामाजिक – साहित्यिक – कलात्मक तसेच आर्थिक अनुभवांचे, आदानप्रदानाचे ते जिवंत आणि चैतन्यपूर्ण असे घटक आहेत. अशा प्राचीन वारसास्थळे तसेच देवालयांना केवळ वास्तू (मॉन्युमेंट) किंवा संग्रहालये (म्युझियम), अशा संज्ञांपुरते मर्यादित करू नका, असे कळकळीचे आवाहन ‘बोध’ या थिंक टँकचे सह-संस्थापक, भारतीय शिक्षण व तत्त्वज्ञान या विषयाचे तज्ज्ञ पंकज सक्सेना यांनी केले.

देशाचा सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा नव्या पिढीला माहित व्हावा आणि भारतीय ज्ञानप्रणालींच्या सखोल पैलूंचे त्यांना आकलन व्हावे या उद्देशाने पुण्यातील नेशन फर्स्ट व चाणक्य मंडल परिवार यांच्या वतीने ‘भारत विमर्श’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत आयोजित पहिल्या कार्यक्रमात सक्सेना बोलत होते. बंगलोर – मुंबई महामार्गावर बाणेर येथे असलेल्या बंटारा भवनच्या सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्वांना मुक्त प्रवेश होता. दीपप्रज्वलनाने उपक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी पंकज सक्सेना, पुणे महानगर जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष आणि इंडस्ट्रियल मेटल पावडर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश धोका, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ व लेखक डॉ. मिलिंद मोडक, कर्नल नंदू कोरेगावकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. वासुदेव आयटल, आझाद हिंद फोर्स, इम्फाळ फ्रंटचे संस्थापक सदस्य व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती वर्षासाठी पंतप्रधानांनी नेमलेल्या राष्ट्रीय समितीचे सदस्य असलेले प्रेमानंद शर्मा, तमिळ साहित्यातील विद्वान जटायू, नेशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले, सर जदुनाथ सरकार फेलोशिप फॉर इंडियन हिस्ट्रीचे रिसर्च फेलो व ऐतिहासिक काल्पनिक कादंबऱ्यांच्या मालिकेचे लेखक असलेले अमृतांशु पांडे आदी उपस्थित होते.

याबरोबरच प्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ डॉ गो. बं. देगलूरकर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, निवृत्त ब्रिगेडियर संग्राम दळवी, नांदेड सिटीचे संचालक नरसिंग लगड, एक भारत हम भारत संस्थेच्या अनुराधा गोखले, सैन्यदल, डॉक्टरी पेशा, उद्योजक क्षेत्रातील मान्यवर, मोठ्या संख्येने विद्यार्थी या उपक्रमासाठी उपस्थित होते. डॉ. गो. बं. देगलूरकर तसेच पांडुरंग बलकवडे यांचा विशेष सत्कार कार्यक्रमावेळी करण्यात आला.

सक्सेना यांनी आधुनिक हिंदू समाजाला आपल्या प्राचीन, ऐतिहासिक अशा समृद्ध सभ्यतेशी जोडून घेण्याची आवश्यकता सांगितली. “हिंदू या संज्ञेच्या निर्भय उच्चारणालाही आता सुरवात झाली आहे आणि संपूर्ण राष्ट्रात हिंदू चैतन्याची एक लहर सळसळते आहे. हे सळसळते चैतन्य केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित राहू नये. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक, साहित्यिक, आर्थिक क्षेत्रांतही हिंदू चैतन्य खेळते राहावे, जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत प्रवाहित व्हावे, यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. ‘भारत विमर्श’ ही अशा प्रयत्नांची सुरवात आहे”, असे सक्सेना म्हणाले.

‘भारत विमर्श’ अंतर्गत पहिल्या सत्रात ‘देवालय’ या शीर्षकांतर्गत पंकज सक्सेना, लेखिका, संशोधक, ब्लॉगर तसेच हिंदू देवालयांच्या अभ्यासक मोनिदीपा बोस – डे आणि लेखक, इंडियन नॉलेज सिस्टीम उपक्रमाचे सदस्य रामकृष्ण कोंगाल्ला, यांनी विचार मांडले.

मंदिरांची उभारणी दर्शनासाठी झाली, पण या दर्शनाची व्याप्ती मोठी आहे. केवळ मूर्तीचे दर्शनच नव्हे, तर आपल्या तत्त्वविचारांचे, जीवनधारणांचे, नीतिमूल्यांचे, निष्ठांचे, कलादृष्टीचे आणि सत्याचे दर्शन अभिप्रेत आहे. एक सर्वव्यापक अशी इकोसिस्टीम देवालयांनी घडवली, विकसित केली, असे मत सक्सेना यांनी व्यक्त केले. मंदिरांनी निर्माण केलेल्या इको सिस्टीमचे पुनरुज्जीवन व्हावे, मंदिरांचे मूळ स्वरूपात पुनर्निर्माण व्हावे, असेही ते म्हणाले.

मोनिदीपा बोस म्हणाल्या, “मंदिरे, गोपुरे, शिल्पे, चित्रे आणि वास्तु आरेखन या सर्व घटकांतून आपल्या इतिहासाचे जणु दस्तऐवजीकरण केले आहे. इथल्या प्रत्येक मूर्तीला, शिल्पाला अर्थ आहेत, संदेश आहे आणि वास्तूची उभारणी सशास्त्र आधारावर केली आहे.”

रामकृष्ण कोंगाल्ला यांनी मंदिरस्थापत्य, शिल्पांकन आणि मूर्तीविज्ञान या विषयांमध्ये आपल्या पूर्वसुरींनी गाठलेली उंची आश्चर्यकारक असल्याचा उल्लेख केला. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अर्थात आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अखत्यारीत असलेल्या सुमारे साडेतीन हजार वास्तूंमध्ये तब्बल ३ हजार मंदिरांचा समावेश आहे. ही आकडेवारीच मंदिरांचे सर्वस्पर्शी महत्त्व अधोरेखित करणारी आहे, असे ते म्हणाले. संयुक्ता भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच माण्य्वाराम्चा परिचय करून दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading