जंगले हा नैसर्गिक वारसा, त्याप्रती कृतज्ञ आणि संवेदनशील राहा
ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांचे आवाहन
उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगला वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्स
पुणे – जंगले हा आपला नैसर्गिक वारसा आहे. निसर्गाचे ते सर्वश्रेष्ठ रूप आहे. या वारशाप्रती कृतज्ञ आणि संवेदनशील राहा, असे आवाहन ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर विभागाचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी शनिवारी येथे केले. नैसर्गिक वारशाचे जतन करण्यासाठी स्थानिकांचे योगदान मिळवणे गरजेचे आहे. ताडोबा परिसरात स्थानिकांचे योगदान, वनविभागाचे नियोजन आणि कार्यक्षम टीम, यांच्यामुळे एक आदर्श जतन व संवर्धन मॉडेल तयार झाले आहे, असेही पाठक म्हणाले. जंगल बेल्स, नेचरवाॅक चॅरिटेबल ट्रस्ट आणि बोगनवेल फार्म्स यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित तिसऱ्या वाईल्डलाईफ फेस्टिव्हल फाॅर किड्स या उपक्रमात ते बोलत होते. सदर उपक्रमाला पुणे वनविभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी वनसंरक्षक (पुणे विभाग) आशिष ठाकरे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, पुण्यातील वन्यजीवप्रेमी संजय देशपांडे, जंगल बेल्सच्या संस्थापिका हेमांगी वर्तक, नेचरवाॅक चॅरिटेबल ट्रस्टचे दीप्ती व अनुज खरे व विनोद बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर असलेल्या बोगनवेल फार्म्स येथे हा फेस्टिव्हल संपन्न झाला. फेस्टिव्हलला पालक व मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. .
कुशाग्र पाठक यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील विविध बफर झोनच्या यशस्वी निर्मिती आणि नियोजनाची माहिती दिली. जंगलाचे कोअर आणि बफर झोन, असे प्रमुख विभाग असतात. राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित व्याघ्र प्रकल्पांत कोअर म्हणजे गाभा क्षेत्रांत मानवी वस्त्या, वाहतूक, रस्ते वा अन्य हालचालींना परवानगी नसते. मात्र, बफर विभागात काही प्रमाणांत या हालचालींना परवानगी असते. सर्व इको टूरिझम उपक्रम बफर झोनच्या मर्यादेतच होतात. या पार्श्वभूमीवर शेकडो मैलांचा परीघ व्यापलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये सुमारे २ लाख वस्ती आणि दीडशेहून अधिक वाघ व अन्य वन्य प्राण्यांचे सहजीवन सुरू आहे. ताडोबा जंगल इतर अनेक जंगलांना कॉरिडॉरने जोडलेले असल्याने सुमारे दीडशे वाघ बफर क्षेत्रांत सातत्याने वावरत असतात. त्यामुळे बफर झोन आणि मानवी वस्ती, यांचे व्यवस्थापन हे मोठे आव्हान आहे, असे पाठक म्हणाले.
बफर झोन मधील हालचाली सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिकांचे योगदान अपरिहार्य आणि योग्य असते. बफर हे जंगलाच्या गाभ्याभोवतीचे क्षेत्र असल्याने वन्यजीव सतत कोअर आणि बफर, असे वावरत असतात. प्रसंगी मानव आणि वन्यजीव संघर्षाचे प्रसंग घडतात. मात्र, ताडोबा परिसरात बफर क्षेत्रातील स्थानिकांना जंगल गाईड, ड्रायव्हिंग, हाॅटेल व्यवस्थापन अशा विविध ठिकाणी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करण्यात आल्याने, स्थानिक रहिवासी आपलेपणाने जंगलाच्या जतनासाठी प्रयत्न करतात. परिणामी ताडोबामध्ये जंगल संरक्षण, जतनाचे चांगले प्रारूप निर्माण झाल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले.
ताडोबातील अत्यंत प्रसिद्ध अशा छोटा मटका या जखमी वाघावर सध्या उपचार सुरु आहेत, त्याविषयी प्रश्न विचारला असता पाठक म्हणाले, त्याची प्रकृती आता ठीक आहे. उपचारानंतर त्याला परत जंगलात सोडायचे की नाही यासाठी वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल. परंतु सद्य परिस्थितीत त्याला परत जंगलात सोडले असता त्याची वाचण्यची शक्यता कमी आहे. छोटा मटका या वाघाशी आपण सर्व भावनिक दृष्ट्या जोडलो गेलो असलो तरी या एका घटनेचा विचार न करता आपल्या संपूर्ण व्याघ्र प्रजातीचा विचार करायला पाहिजे आणि असाच विचार ताडोबात केला गेल्यामुले आज व्याघ्र संवर्धनात ताडोबाला चांगले यश मिळाले, असे त्यांनी सांगितले.
ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील प्रसिद्ध माया वाघिणीवर आधारित ‘एक होती माया’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक अनंत सोनावणे यांनी माया वाघिणीच्या चित्तथरारक गोष्टी उलगडल्या. ताडोबाचे रेस्क्यू मॅन म्हणून सुपरिचित असलेले डाॅ. रविकांत खोब्रागडे यांनी ताडोबात हाताळलेल्या वन्यप्राण्यांच्या काही रोमांचक रेस्क्यू ऑपरेशनची माहिती दिली.
टायगर लीगसी फिल्म्स सर्व्हिसेसचे सुमेश लेखी यांनी ताडोबातील वाघांवर चित्रित केलेल्या काही व्हिडिओजचे सादरीकरण केले. ते म्हणाले की, पृथ्वीचा फक्त ३ टक्के भूभाग असलेल्या भारतात जगाच्या संपूर्ण लोकसंख्येच्या १९ टक्के लोकसंख्या भारतात आहे. असे असून देखील भारतातील जैवविविधता जपण्यात आपल्याला यश मिळाले आहे. वन्यप्राणी संवर्धनासाठी या विषयावर लघुपट निर्मितीला आणखी चालना द्यायला हवी असे मत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केले. जंगल आपल्याला संयम, धीर, निरीक्षणाचे महत्त्व शिकवते, असे देखील ते म्हणाले.
सुरवातीला पपेट शो सादर करण्यात आला. तसेच नल्ला मुत्थू यांची ताडोबावर केलेली फिल्म दाखविण्यात आली. शेकडो पक्षी आणि प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबाचे बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या ताडोबा जंगलातील अनुभवकथनाच्या विशेष सत्राने या फेस्टिव्हलची सांगता झाली.
