बुधवारपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस
पुणे: प्रतिनिधी
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्र पुढील 48 तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होईल. मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल. त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 450 किमीवर आहे. त्याचे रूपांतर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर जात असले तरी सोमवारी पुन्हा ते वळण घेण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या मधल्या भागात बुधवारी सरकेल. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर बुधवार ते गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.
