आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला निश्चितपणे न्याय दिला जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फलटण: प्रतिनिधी
आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला निश्चितपणे न्याय दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, प्रत्येक गोष्टीत राजकारण सहन केले जाणार नाही, अशी तंबीही विरोधकांना दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते येथील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजीत निंबाळकर, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व बाबी तपासात उघड होतीलच. मात्र, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
या आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून जाणीवपूर्वक माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि आमदार संदीप कांबळे यांची नावे गोवण्यात येत आहेत. त्यांच्या सहभागाबद्दल जराशी जरी शंका असती, तरी मी आजचा कार्यक्रम रद्द केला असता. मात्र, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची वृत्ती निंदनीय आहे. त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.
