लाडकी बहीण योजना महायुती सरकार सत्तेवर असेपर्यंत बंद होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फलटण: प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह कोणतीही शासकीय योजना महायुती सरकार सत्तेवर असेपर्यंत बंद होणार नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
येथील विविध विकासकामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना बंद होणार अशी हाकाटी विरोधक दीर्घकाळापासून पिटत आहेत. मात्र, जोपर्यंत देवभाऊ, शिंदेसाहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. महायुती सरकारची कोणतीही योजना महायुती सरकार असेपर्यंत बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढील पाच वर्षांनी आपले कॉन्ट्रॅक्ट कायम ठेवा, योजना पुढील पाच वर्ष सुरू राहतील, असेही ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने राज्याच्या इतिहासात सर्वात मोठे 32 हजार कोटीचे पॅकेज दिले आहे. त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यात सध्या सौर ऊर्जा विकसनाचे काम जोरात सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना दिवसभर 12 तास मोफत सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाईल. त्याचप्रमाणे सर्व उपसा जलसिंचन योजना सौरऊर्जेवर चालवल्या जाणाऱ असून विजेचे बिल न भरल्यामुळे या योजना बंद पडण्याचे प्रमाण संपुष्टात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फलटण, खंडाळा, खटाव, माण तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्याबरोबरच अनेक विकास कामांना गती देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
