उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांची पाठ थोपटली
पुणे: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांची पाठ थोपटली. काम करणारा कार्यकर्ता, अशा शब्दात त्यांचे कौतुकही केले. त्याचवेळी, महायुतीत दंगा नको, अशा शब्दात त्यांना समजही देण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी देवस्थानला भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी रवींद्र धंगेकर उपस्थित होते. त्यावेळी हेलिपॅडवरच शिंदे आणि धंगेकर यांच्यात चर्चा झाली. विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल, असे काही न करण्याच्या सूचना शिंदे यांच्याकडून धंगेकर यांना देण्यात आल्या. शिंदे, धंगेकर यांच्या भेटीनंतर जैन बोर्डिंग हाऊसवरून धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर पडदा पडणार का, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
जैन समाजाला विश्वासात न घेता जैन बोर्डिंग हाऊसची मालमत्ता विश्वस्तांना हाताशी धरून पदरात पाडून घेण्याच्या व्यवहारात मोहोळ यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांनी आपल्या राजकीय शक्तीचा व शासकीय यंत्रणाचा वापर करून ही जागा पदरात पाडून घेतली, असा आरोप धंगेकर सातत्याने करीत आहेत.
याआधी संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात पळून गेल्यानंतर ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
महायुतीतील घटक पक्षाबीचे महानगर प्रमुख असून देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धंगेकर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आरोप करत असल्याबद्दल भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपकडून याबाबत यापूर्वीच शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
दुसरीकडे, ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनी धंगेकर यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. मात्र, युती धर्माचे पालन करण्यासाठी दोन्ही बाजूंनी संयम बाळगणे गरजेचे आहे, याची जाणीव देखील त्यांनी करून दिली. ठाणे, नवी मुंबईतील आरोप प्रत्यारोपांचे प्रकार देखील थांबले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट समजले जाणारे गणेश नाईक यांच्याकडून खुद्द एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली जात आहे.
