Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

ध्यासविषयात बुडून गेलेल्या कलावतीचे अंतर्नाद ऐकवणारे लेखन – डाॅ. अरुणा ढेरे 

पुणे :  घुंगराचा नाद ऐकावा तसा एका कलावतीचा आपल्या ध्यासविषयात बुडून केलेला अंतर्नाद विदुषी शमा भाटे यांच्या लेखनातून वाचकांना भेटतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डाॅ. अरुणा ढेरे यांनी केले. कलासाधना गांभीर्याने आणि प्रामाणिकपणाने करणारे सगळे कलावंत एकाच वाटेवर चालत असतात आणि कुठेतरी, केव्हातरी एकमेकांना भेटतही असतात, असेही त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ कथक नृत्यांगना, नृत्यगुरू, संरचनाकार, लेखक विदुषी शमा भाटे लिखित ‘नृत्यमय जग ..नर्तनाचा धर्म’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. याप्रसंगी लेखिका शमा भाटे, पुस्तकाच्या संपादक वंदना बोकील, डाॅ. अरुणा ढेरे आणि राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर व्यासपीठावर उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात रविवारी सकाळी हा समारंभ झाला. ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर, मनीषा साठे, तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अरुणाताई पुढे म्हणाल्या, “शमाताईंच्या लेखनाला संवादी नाद आहे. शमाताईंमधील अखंड जागरुक शिष्या या लेखनातून भेटते. प्रत्येक नवी गोष्ट तारतम्याने स्वीकारणे, सूक्ष्म चिकित्सेची नजर, लेखनातील कमालीचा प्रांजळपणा, शब्दापलीकडचा आशय पकडणारी, नेमकी शब्दविधाने…अशी अनेक वैशिष्ट्ये सामावलेले असे हे आत्मकथन आहे. शमाताईंमधील रसज्ञ, भावज्ञ नृत्यांगना इतर अनेक कलांशी सत्संग करते, परंपरा आणि नवता यांच्यातील कलात्मक समन्वय साधते, एका पातळीवर नृत्यानुभव हा शास्त्रापलीकडे कसा जातो, हे सांगते. स्वतःच्या अपयशाविषयीदेखिल सांगते. तेही परखडपणे आणि तटस्थतेने, हे महत्त्वाचे आहे. शमाताईंच्या सहज, सोप्या आणि नर्मविनोदी शैलीमुळे हे पुस्तक प्रवाही, ओघवते झाले आहे”, असेही त्या म्हणाल्या.

दिलीप माजगावकर म्हणाले, “वेगळेपण आणि शमा भाटे, हे समीकरण आहे. त्या कथक नृत्यांगना आहेत, पण इतर अनेक कला, साहित्यांत त्यांना रस आहे. त्याविषयीचे स्पष्ट पण सौम्य मत आहे. या पुस्तकात शमाताईंचे आत्मकथन असले, तरी हा प्रामुख्याने त्यांचा कलाप्रवास आहे. या लेखनात कलाप्रवास आणि वैयक्तिक जीवन, यांची सरमिसळ झाली आहे. त्याचप्रमाणे पुस्तकाचे लेखन दोन पातळ्यांवर झाले आहे. लेखनातील भूतकाळातील संदर्भ, घटना तृतीय पुरुषी कथनांतून पुढे येतात तर वैयक्तिक आणि नृत्याचा सूर सापडल्यावर हे लेखन प्रथम पुरुषी निवेदन स्वीकारते. एकाचवेळी अशा दोन पातळ्यांवर वावरणारे लेखन मराठी साहित्यात अभावानेच आढळते. नृत्य हाच धर्म मानून निष्ठापूर्वक ती तत्त्वे अंगिकारलेल्या कलावतीचे हे लेखन म्हणूनच अनेक अर्थांनी वेगळेपण जपणारे आहे”.

मनोगत मांडताना शमा भाटे म्हणाल्या, “माझी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष तालीम, त्याकाळी सभोवती घडणाऱ्या कला क्षेत्रातल्या घटना, माझ्या विचारांवर त्याचा होणारा परिणाम आणि कथक नृत्याच्या अपरिमित शक्यतांचा शोध, असे चार मुद्दे मनात ठेवून, मी हे लेखन केले. नृत्य जगलेल्या, नृत्यातच ठेचा खाल्लेल्या आणि नृत्यातच मोहरलेल्या व्यक्तीची ही कथा आहे”.

वंदना बोकील यांनी शमाताईंच्या पुस्तकाचे संपादन करत असतानाचे अनुभव मांडले. शमाताई या विचारवंत कलावंत आहेत, असे सांगून वंदना बोकील म्हणाल्या, “परफाॅर्मिंग आर्टच्या क्षेत्रात स्वतंत्र विचारांचे फार कमी कलावंत असतात. शमाताई अशा दुर्मिळ कलावती आहेत. त्यांच्या माध्यमावर त्यांची जबरदस्त पकड तर आहेच, पण त्यामागील सूक्ष्म विचार त्या नेमकेपणाने मांडू शकतात, याचा प्रत्यय या पुस्तकातून येईल. स्वतःला सोलून काढत अखेर आत गाभ्यात काय सापडलं, ते जसंच्या तसं मांडण्याचा प्रांजळपणा आणि धैर्य, या लेखनात आहे. त्यांची भाषा सहज, नितळ आणि आशयाला तोलणारी आहे. किंचित मिष्किल वृत्तीही त्यात आहे. कलाक्षेत्रात सजग आत्मभान ठेवत, गेल्या ५० वर्षांतील चित्रपट, रंगभूमी, संगीत, सामाजिक क्षेत्रांत उमटणार्या स्पंदनांचा आलेखही पुस्तकात उमटला आहे”, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शमा भाटे लिखित या पुस्तकाच्या काही भागांचे अभिवाचन गौरी लागू आणि गौरी देशपांडे यांनी केले. शमाताईंच्या शिष्या अमीरा पाटणकर आणि अवनी गद्रे यांनी प्रारंभी सूर्यवंदना सादर केली. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले. अमीरा पाटणकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading