Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संघ प्रार्थना हा संघाचा सामुहिक संकल्प – डॉ. मोहन भागवत

‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या ध्वनीचित्रफितीच्या हिंदी निवेदन असलेल्या संघ प्रार्थनेचे डॉ. भागवत यांच्या हस्ते लोकार्पण
या उपक्रमाद्वारे विविध भाषांमध्ये जाणून घेता येणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना

पुण्यातील सिद्धार्थ शिरोळे व इंद्रनील चितळे यांच्या पुढाकाराने ध्वनीचित्रफितीची निर्मिती

नागपूर  : १९३९ पासून ते आज पर्यंत देशातील प्रत्येक स्वयंसेवक हा दररोज संघाच्या शाखेवर संघ प्रार्थनेचे उच्चारण करत असतो. व्यक्तीगत संकल्प स्वयंसेवकाच्या प्रतिज्ञेत असतो पण आम्ही सगळे मिळून काय करायचे हे संघाची प्रार्थना सांगते. म्हणून संघ प्रार्थना हा संघाचा सामुहिक संकल्प आहे. स्वयंसेवक प्रार्थनेद्वारे रोज या संकल्पाची आठवण करतात. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. डॉ. भागवत यांच्या हस्ते आज नागपूर रेशीमबागेमधील स्मृती भवन येथील व्यास सभागृहात ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या ध्वनीचित्रफितीच्या हिंदी निवेदन असलेल्या संघ प्रार्थनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. संघ प्रार्थना ही फक्त म्हणण्याची प्रार्थन नसून ती अनुभविण्याची गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांची निर्मिती असलेल्या ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष प्रकल्पाचे लोकार्पण डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, इंद्रनील चितळे, हरीश भिमानी, प्रकल्प प्रमुख व संगीत दिग्दर्शक राहुल रानडे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले, “संघ प्रार्थनेमध्ये भारत मातेची प्रार्थना आहे. पहिला नमस्कार भारतमातेला नंतर ईश्वराला नमस्कार केलेला आहे. प्रार्थनेत भारत मातेकडे काहीही मागितले नाही. जे मागितले आहे ते ईश्वराकडे मागितले आहे आणि भारतमातेकरीता मागितले आहे. रोज होणाऱ्या प्रार्थना उच्चारणाने संघ प्रार्थनेला मंत्रांचे सामर्थ्य लाभले आहे. रोज प्रत्येक स्वयंसेवक संघ प्रार्थना करण्यासाठी धडपडत असतो. यामधून तो स्वयंसेवक म्हणून घडत असतो, पक्का होत असतो.” संघ प्रार्थनेचा अर्थ त्याची गंभीरता, त्याची भव्यता जाणून घेण्यासाठी केलेला हा प्रकल्प मला कौतुकास्पद वाटतो. या प्रकल्पाद्वारे शब्द आणि अर्थाच्या पलीकडे जाऊन प्रार्थनेचा अर्थ नागरिकांपर्यंत पोहोचावा हा असलेला उद्देश नक्की साध्य होईल, असा विश्वास यावेळी डॉ. भागवत यांनी व्यक्त केला.

संघ प्राथना हा भाव आहे. या प्रार्थनेच्या भावात संकल्पाची दृढता, मातृभूमीप्रती भक्ती, प्रेम आणि समर्थन आहे. या प्रार्थनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांना संस्कार मिळतात. संघ प्रार्थनेचा विचार पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा या प्रकल्पाद्वारे ज्यांनी पूर्णत्त्वास नेली त्या सर्वांचेच कौतुक असल्याचेही डॉ. भागवत यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे काम करण्याचे सौभाग्य मला आजवर लाभले असताना आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे असे मला वाटते. आज संघाच्या सरसंघचालकांची भेट घेण्याचा, त्यांच्यासोबत थोडा वेळ व्यतीत करण्याचा योग जुळून आला हे मी माझे सौभाग्य समजतो. ही माझी अनेक दशकांची इच्छा होती, ती आज कृतीत उतरली याचा आनंद असल्याचे सांगत सिद्धार्थ शिरोळे पुढे म्हणाले, “आज संघ विचारांमुळेच आपला देश सुरक्षित आहे आणि याबरोबरच प्रगतीशील देखील होत आहे. या विचारांचे नेतृत्त्व करणाऱ्या व्यक्तीच्या हातून या प्रकल्पाचे लोकार्पण महत्त्वाचे आहे. गाण्याला सर्वाधिक आयुष्य असते असे म्हणतात, या प्रार्थनेचा अर्थ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच या प्रकल्पामागील उद्देश आहे. निवडणुकांवेळी पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर जी परिस्थिती पाहिली त्यामुळे संघ प्रार्थना, त्यामागील विचार किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आले. या प्रकल्पाद्वारे मोठे राष्ट्रनिर्माणाचे कार्य उभे राहिले आणि ते करण्याची ही संधी मला मिळाली याचा आनंद आहे.”

सदर प्रकल्पाची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्यावर त्यांनी लागलीच अनुमोदन देत प्रोत्साहन दिले अशी आठवण शिरोळे यांनी सांगितली.

आभार प्रदर्शन करताना इंद्रनील चितळे म्हणाले, “चितळे उद्योग समूह हा गेली चार पिढ्या म्हणजेच जवळपास ९० वर्षे चालू असलेला समूह आहे. सातत्य कसे राखले गेले पाहिजे याचा विचार आम्ही कायम करत असतो. पुढील पिढीला काय अपेक्षित आहे हा विचार यामध्ये असतोच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गेली १०० वर्षे सातत्याने कार्यरत असलेले संघटन आहे, विचारसरणी आहे. त्यांचे राष्ट्रनिर्माणातील कार्य महत्त्वाचे आहे, हे सर्व लक्षात घेत आम्ही या प्रकल्पात सहभागी झालो. आणि आज त्याचा आम्हाला अभिमान आहे.”

सामान्य नागरिकांपर्यंत संघाची प्रार्थना आणि त्याचा योग्य अर्थ पोहोचावा या उद्देशाने संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने ही प्रार्थना तयार केली असून याचे गायन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक शंकर महादेवन यांनी केले आहे. याबद्दल बोलताना राहुल रानडे म्हणाले, “हरीश भिमानी यांनी या प्रकल्पाकडे माझे लक्ष वेधले आणि मला प्रोत्साहन देखील दिले.  त्याला एका वेगळ्याच पद्धतीने सादर करण्याची कल्पना मला सुचली. आज डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण झाले याचा आनंद आहे.”

प्रार्थनेचे हिंदी भाषेतील लेखन आणि निवेदन हरीश भिमानी यांनी केले आहे. मराठी अर्थ विवेक आपटे यांनी लिहिला असून निवेदन सचिन खेडेकर यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या ८ भाषांमध्ये प्रार्थनेच्या अर्थाचे निवेदन प्रकाशित होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या प्रकल्पाची मूळ संकल्पना हरीश भिमानी यांची असून राहुल रानडे यांनी प्रकल्प प्रमुख व संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या प्रार्थनेचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून लंडन येथील रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या वादकांनी याला स्वरसाज चढविला आहे. प्रार्थनेचे ध्वनीमुद्रण लंडन येथील ॲबी रोड स्टुडिओज आणि मुंबई येथील यशराज फिल्म्स या ठिकाणी पूर्ण झाले असून ध्वनीमिश्रण व मास्टरिंग विजय दयाळ यांनी केले आहे. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष अडोणी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading