गायन, वादनाने १२ वा भारतरत्न पं. भीमसेन जोशी महोत्सव संपन्न
पुणे : दिग्गज कलाकारांचे गायन, वादन आणि रसिक प्रेक्षकांचा लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद यांमुळे १२ वा भारतरत्न पं. भीमसेन जोशी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगावचे जागतिक कीर्तीचे बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी यांचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे समन्वयक असलेले रामराव नायक, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक व किराणा घराण्याचे गायक पं. सुधाकर चव्हाण आणि द औंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वास्तुविशारद अभिजित सुभाष गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुरस्कार वितरण समारंभावेळी पुरस्काराला उत्तर देताना पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि सवाई गंधर्व यांचे नातू, प्रसिद्ध गायक पं. श्रीकांत देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कुलकर्णी म्हणाले, “पं. भीमसेन जोशी यांचे नाव एक कलाकार व एक व्यक्ती म्हणून खूप मोठे आहे. आज त्यांच्या नावाने दिलेला पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पंडितजींना सगळे अण्णा म्हणायचे. माझे वडील अण्णांपेक्षा फक्त एका वर्षाने लहान. मला आठवते की सुरुवातीला जेव्हा अण्णा फार लोकप्रिय नव्हते तेव्हा वडिलांनी त्यांच्या किमान ४० ते ४५ खाजगी मैफली केल्या होत्या. त्या वेळी मी लहान असल्याने सोबत असायचो म्हणूनच संतवाणीमधील भजनांचे संस्कार बालवयातच माझ्यावर झाले. कळत्या वयात पं. श्रीकांत देशपांडे यांसोबतच गहरी मैत्री झाली आणि मी समृद्ध होत गेलो. पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य असलेल्या पं. सुधाकर चव्हाण यांच्या संस्थेच्या वतीने मिळत असलेला हा पुरस्कार म्हणूनच खास आहे.” गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित होत असलेल्या या संगीत महोत्सवामुळे या भागातील रसिकांची सांस्कृतिक भूक शमवली जात आहे हे पाहून आनंद झाला, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
या आधी तीन दिवसीय महोत्सवाच्या पहिल्या दिवशी किराणा घराण्याचे आश्वासक युवा गायक विराज जोशी, प्रसिद्ध बासरीवादक पं. प्रवीण गोडखिंडी आणि गायिका रोंकिणी गुप्ता यांनी आपली कला सादर केली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात पं. सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने झाली. यावेळी त्यांनी राग पुरिया धनाश्री गायला. यामध्ये त्यांनी ‘अब तो रितु मान…’ ही विलंबित बंदिश व छोटा ख्याल मध्ये ‘बीत गये जुगवा…’, ‘पायलिया झनकार मोरी…’ या रचना गायल्या. ‘अवघा रंग एक झाला…’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. चव्हाण यांना प्रभाकर पांडव (संवादिनी), किशोर कोरडे (तबला), अभयसिंह वाघचौरे व रवी पांचाळ (तानपुरा) तर शिवानंद स्वामी यांनी स्वरसाथ केली. यानंतर पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या बहारदार तबलावादन उपस्थितांना भारावून सोडले. पं घाटे यांना अभिषेक शिनकर (संवादिनी) व सुरंजन खंडाळकर यांनी गायनसाथ केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पं. राम देशपांडे यांच्या गायनाने झाला. यावेळी त्यांनी राग मियां मल्हारची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘अत धूम धार…’ हा विलंबित तिलवाडा, ‘अब घन बरसे…’ ही श्रुत तीन तालातील रचना यांचे प्रभावी सादरीकरण केले. पं. देशपांडे यांना अजिंक्य जोशी (तबला), नीलय साळवी (संवादिनी) आणि गंधार देशपांडे यांनी स्वरसाथ केली.
महोत्सवाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवसाची सुरुवात गायिका आरती नायक यांच्या गायन प्रस्तुतीने झाली. त्यांनी राग हंसध्वनी सादर केला. यामध्ये त्यांनी मत्त तालात ‘महाराज हो तुम…’ ही बंदिश गायली. द्रुत तीन तालातील प्रभावी तराणा सादर करीत त्यांनी रसिकांची वाह वाह मिळवली. यानंतर त्यांनी मल्हार- बसंती मल्हार रागातील स्वत: रचलेली द्रुत एक तालातील ‘सखी श्याम आये मेघ संग…’ ही बंदिश गायली. राग बिहाग मध्ये ‘हो मिल जा…’ हा पंजाबी टप्पा त्यांनी गायला. ‘गोपाला मोरी करुणा क्युं नाही आवे….’ या रचनेने त्यांनी समारोप केला. यावेळी पांडूरंग पवार यांनी तबला तर निलय साळवी यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
महोत्सवाचा समारोप कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि तबलावादक निखील फाटक यांच्या ‘कथक तबल्याचा मिलाफ – कपल ऑफ मेनी थिंग्ज’ हा कार्यक्रमाच्या प्रस्तुतीने झाला. सुरुवातीला तत्कारमध्ये या दोघांनी तबला व कथक जुगलबंदी प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी महाभारतातील द्युत क्रीडा, द्रौपदी वस्त्रहरण यांच्या पार्श्वभूमीवर काही समकालीन प्रसंगांची तुलना करीत सुनो द्रौपदी शस्त्र उठलो अब गोविंद ना आएंगे आणि स्वतःच रक्षण स्त्रियांनी स्वतः करण्याची वेळ आली आहे असा संदेश दिला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील कवी भूषण यांचे ब्रीज भाषेतील काव्य, महाराजांची सेना लढाईला जाताना कशी जाते त्याचे वर्णन करणारा छंद आणि महाराज हे मुघलांसाठी कसे वरचढ होते याचे वर्णन करणारे काव्य यांचे सानुभव सादरीकरण केले. ‘याद पिया की आये…’, ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे…’ या ठुमरीची बहारदार प्रस्तुती त्यांनी केली. ‘बरसन लागी….’ ही होरी सादर करीत त्यांनी समारोप केला. या दोघांना अमृता ठाकूर यांनी की बोर्ड आणि अबोली यांनी गायनसाथ केली. आकाश थिटे यांनी संपूर्ण महोत्सवाचे निवेदन केले.
