Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सामाजिक-सांस्कृतिक सुधारणांचा केंद्रबिंदू आणि भारतीय लोकशाहीचा पाया : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड

पुणे  : – पुणे केवळ शैक्षणिक केंद्र नसून महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांचे हृदयस्थान राहिले आहे. ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या समृद्ध शैक्षणिक आणि बौद्धिक वारशाने येथे अनेक समाजसुधारकांनी न्याय, समानता आणि स्वातंत्र्य यांसारख्या मूल्यांची मुळे रुजवली आहेत,असे प्रतिपादन भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इरावती कर्वे संकुलातील सभागृहात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. १३व्या शतकातील वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्यापासून ते शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई आणि महर्षी कर्वे यांच्यासारख्या सामाजिक सुधारकांपर्यंत, पुण्याने सामाजिक समतेची परंपरा घट्ट पक्की केली आहे, असे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

शाहू महाराजांनी वंचितांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या, फुले कुटुंबाने शिक्षणाद्वारे सामाजिक न्यायाचा पाया तयार केला, सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका म्हणून स्त्रीशिक्षणाला चालना दिली तर टिळकांनी स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क मानण्याचा संदेश दिला. रानडे आणि आगरकरांनी कायद्याच्या मदतीने सामाजिक सुधारणा घडवून आणल्या, रमाबाईंनी स्त्री अत्याचारांविरोधात आवाज उठवला आणि कर्वेंनी महिला शिक्षणासाठी पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले.या सामाजिक-सांस्कृतिक चळवळींमुळे संविधानातील समानता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्य या मूलभूत मूल्यांची मुळे महाराष्ट्रातूनच भारतीय लोकशाहीत रुजली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हा फक्त लिखित दस्तऐवज नसून लोकांच्या अनुभवांचा आणि सामाजिक परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहे. पुण्याच्या प्रगत विचारसरणीने भारतीय लोकशाहीची पायाभरणी केली असून आजही ती समताधिष्ठित समाजाकडे वाटचाल करण्यास मार्गदर्शक ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले .

विधीमंडळाइतकेच महत्त्वाचे कार्य न्याय मंडळ करत असते. तंत्रज्ञानाने न्यायदानात महत्त्वाची भूमिका कशी बजावली आहे परंतु याबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिकता आणि मूल्ये यांचे भान कसे सांभाळले पाहिजे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक, राजकीय आर्थिक न्यायाची तत्वे आपल्या न्यायनिवाड्यातून अवलंबताना प्राचीन भारतीय शाश्वत मूल्यांचा प्रभाव त्यांच्या विचारधारेत कसा होता हेही विशद केले आणि आपल्या विविध न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत सुप्रीम कोर्ट सर्वसामान्यांसाठी न्याय देतानाच कायद्याची परंपरा कशी पुढे नेते याचे उत्कृष्ट दाखले त्यांनी दिले. आपल्या शेजारील देशात लोकशाहीतून अराजकतेकडे जाण्याचे प्रसंग घडत असले तरी भारतात अशी अवस्था होणार नाही कारण इथली लोकशाही ही भारतीय मजबूत मूल्यावर आधारित व संविधानाच्या पायावर भक्कम उभी आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले. त्यांचे मार्गदर्शन जेन-झी मधल्या उदयोन्मुख वकिलांसाठी, प्राध्यापकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचे होते. “आपण संविधानाच्या ७५ वर्षांचा उत्सव साजरा करत आहोत, ही केवळ ऐतिहासिक पूर्तता नाही, तर आपल्या लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा – न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व – यांचा गौरव करण्याची संधी आहे. संविधान हा केवळ भूतकाळाचा दस्तऐवज नाही, तर तो आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचं एक जिवंत वचन आहे, जे प्रत्येक नागरिकाच्या जीवनात साकार होणं अत्यावश्यक आहे,” असे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

विद्यापीठात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली घटित करण्यात आलेल्या समितीमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाच्या विधी विभागामार्फत “भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : न्यायाच्या वचनपूर्तीची प्रक्रिया” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आज उद्घाटन करण्यात आले. या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, ऍडव्होकेट डॉ. उदय वारुंजकर, ऍडव्होकेट डॉ. विद्याधर कुलकर्णी, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, प्रा. डॉ. सोनिया नगराळे, विभागप्रमुख प्रा. डॉ. नरेश वाघमारे ,व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी केले .मान्यवरांचा परिचय प्रा . ज्योती भाकरे यांनी केला . तर आभार प्रा. डॉ. सोनिया नगराळे यांनी मानले. विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सर्व विधी व्यावसायिक, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी तसेच राज्यघटनाविषयक अभ्यासक यांचा या परिसंवादासाठी उत्स्फूर्त सहभाग लाभला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading