कोरोमंडल इंटरनॅशनलने सुरू केले आपले १००० वे ग्रोमोर रिटेल केंद्र
पुणे : भारतामधील अग्रगण्य कृषी उपाय पुरवठेदारांपैकी एक असलेल्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडने महाराष्ट्रातील पुणे (काष्टी-अहिल्यानगर) येथे आपले 1000 वे ग्रोमोर रिटेल केंद्र सुरू करून एक महत्त्वाचा मैलाचा टप्पा गाठला. ‘आपलं ग्रोमोर’ केंद्र हे कोरोमंडलच्या भारतातील शेतकरी समुदायाशी असलेल्या वाढत्या संबंधांचे आणि या प्रदेशातील वाढत्या उपस्थितीचे प्रतीक आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला अरुण अळगप्पन– कार्यकारी अध्यक्ष आणि श्री. एस. शंकरसुब्रमणियन– व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, तसेच कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्व टीमने उपस्थिती लावली.
कोरोमंडलने ग्रामीण रिटेल क्षेत्रात 2007 साली “माय ग्रोमोर” या ब्रँडखाली प्रवेश केला आणि त्यानंतर दक्षिण भारतीय राज्यांतील शेतकरी समुदायाला विविध कृषी उत्पादने व सेवा पुरवणारी देशातील सर्वात मोठ्या ग्रामीण रिटेल साखळ्यांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली. कृषी विस्तार सेवा, दर्जेदार उत्पादने आणि उत्तम सेवा याबाबत शेतकऱ्यांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कोरोमंडलने आता आपले जाळे दक्षिण राज्यांपलीकडे वाढवले आहे. महाराष्ट्रात प्रवेश करताना कंपनीने 1000 व्या केंद्राचा मैलाचा टप्पा गाठला असून, पुढील दोन वर्षांत हा आकडा दुप्पट करण्याची योजना आखली आहे.
सध्या कोरोमंडलकडे आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये 766 “मना ग्रोमोर”, कर्नाटकमध्ये 195 “नम्मा ग्रोमोर”, तमिळनाडूमध्ये 23 “नम्मधू ग्रोमोर”, आणि महाराष्ट्रात 16 “आपलं ग्रोमोर” अशा पाच राज्यांमध्ये 1000 कंपनी-मालकिची व कंपनीद्वारे चालवली जाणारी केंद्र आहेत. या केंद्रांतून कंपनी आता 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सेवा करते. या केंद्राना 5,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचा संघ पाठिंबा देतो, जो शेतकऱ्यांशी रोजच्या रोज संपर्क साधून विविध विस्तार कार्यक्रम राबवतो आणि त्यांच्या उत्पन्न व शेती उत्पादन वाढीसाठी सहाय्य करतो.
ग्रोमोर रिटेल नेटवर्कला डिजिटल उपायांचा आधार मिळतो, ज्यात मायग्रोमोर अॅपचा समावेश आहे. हे अॅप शेतकऱ्यांना शेतानुसार सल्ला, उत्पादनांचे दर, तसेच छायाचित्रावर आधारित कीड व रोगांची ओळख यांसारख्या सेवा पुरवते. १० लाखांहून अधिक वापरकर्त्यांसह, हे अॅप आधीच केंद्र विक्रीत 15% योगदान देते. शेतकऱ्यांना याशिवाय स्वयंचलित इनव्हॉइस, एसएमएस अपडेट्सद्वारे पारदर्शक किंमत माहिती, घरपोच डिलिव्हरी व आयओटी-आधारित शेती मार्गदर्शन सेवा उपलब्ध होतात.
प्रत्येक ‘माय ग्रोमोर’ केंद्र हे शेतकऱ्यांसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन आहे, जिथे त्यांना विविध कृषी उत्पादने– मोठ्या प्रमाणातील, स्पेशॅलिटी व सेंद्रिय खते, पीकसंरक्षण साधने, बायोलॉजिकल्स, गुरांचे खाद्य व शेती अवजारे उपलब्ध होतात. याशिवाय अतिरिक्त मूल्यवर्धित सेवा म्हणून माती व कार्बन चाचणी,कृषी सल्लागार सेवा, ड्रोनद्वारे फवारणी, तसेच शेतकरी-केंद्रित विमा योजना दिल्या जातात. सरासरी, प्रत्येक केंद्र 10–15 गावांतील 1000 ते 1500 शेतकऱ्यांना सेवा पुरवते.
१०००वे ‘माय ग्रोमोर’ केंद्र, जे ‘आपलं ग्रोमोर’ या ब्रँडखाली काष्टी श्रीगोंदा पट्ट्यात सुरू झाले आहे, शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उत्पादने व सेवा उपलब्ध करून देत असून, कंपनीची महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक मजबूत करत आहे. आधुनिक स्वरूप आणि शेतकरी केंद्रित सेवा यामुळे हे नवीन केंद्र कोरोमंडलची शेती उत्पादकता वाढवण्याची आणि ग्रामीण समृद्धीला हातभार लावण्याची बांधिलकी अधोरेखित करते. कोरोमंडलने पुणे जिल्ह्यात आणखी 20 ग्रोमोर केंद्र सुरू करण्याची योजना आखली आहे, ज्यात काष्टी परिसरातील पाच केंद्र समाविष्ट आहेत, जे शेतकऱ्यांशी असलेले नाते आणखी दृढ करतील.
या प्रसंगी कोरोमंडल इंटरनॅशनलचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अरुण अळगप्पन म्हणाले : “आमच्या १०००व्या ‘माय ग्रोमोर’ स्टोअरचे उद्घाटन हा भारतातील शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या आणि त्यांना सक्षम करण्याच्या कोरोमंडलच्या प्रवासातील अभिमानास्पद टप्पा आहे. 2007 मध्ये कृषी-रिटेलमध्ये छोट्या पावलाने सुरुवात झालेली ही वाटचाल आज देशातील सर्वात मोठ्या कृषी-रिटेल नेटवर्क्सपैकी एक बनली आहे. या केंद्रांनी गेल्या काही वर्षांत शेतकरी समुदायाचे विश्वासू भागीदार म्हणून काम केले आहे, पर्यावरणपूरक कृषी पद्धतींचा प्रसार केला आहे, तसेच दर्जेदार कृषी उत्पादने, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैयक्तिक मार्गदर्शन सेवा योग्य वेळी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे उत्पादकता वाढली आणि उपजीविकेत सुधारणा झाली. आगामी काळात आम्ही आमचे रिटेल जाळे दुप्पट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांशी असलेले आमचे नाते आणखी दृढ होईल आणि ग्रामीण समुदायांसाठी शाश्वत मूल्यनिर्मिती करता येईल.”
‘आपलं ग्रोमोर’ केंद्र हे डिजिटल फार्मिंग सोल्यूशन्ससाठी डेमोन्स्ट्रेशन हब म्हणूनही काम करेल, जिथे मायग्रोमोर अॅप, दूरस्थ मार्गदर्शन सेवा आणि छायाचित्र आधारित कीड व रोगांची ओळख यांसारखी साधने प्रदर्शित केली जातील. तंत्रज्ञान आणि शेतीतील प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम घडवून हे केंद्र शेतकऱ्यांना प्रिसिजन अॅग्रिकल्चर स्वीकारण्यास, उत्पादकता वाढवण्यास आणि अधिक शाश्वत व सक्षम शेती पद्धतींकडे वाटचाल करण्यास मदत करेल. यामुळेच कोरोमंडलचे भारतीय शेतीचे भविष्य घडवण्याचा दृष्टीकोण अधिक बळकट होईल.
