शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री संतापले
केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीला विलंब
मुंबई: प्रतिनिधी
केंद्र सरकारने मोठा निधी देऊन पुरस्कृत केलेल्या लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी करण्यास मोठा विलंब होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकीत कानउघाडणी केली. या योजनांना गती देऊन शासनाकडून येणारा निधी आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत वापरला गेला पाहिजे, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली.
अमृत योजना 0.2 ही केंद्र सरकारने पुरस्कृत केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, उद्याने, जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन आणि मलनि:सारण या कामांसाठी केंद्राकडून तब्बल 9 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सन 2021 मध्ये सुरू झालेली ही योजना 2026 मध्ये संपणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत सर्व कामे वेगाने पूर्ण करून आर्थिक वर्षाअखेरीस केंद्राकडून आलेला निधी वापरण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
आरोग्य विभागाने देखील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ची उभारणी करण्याची कामे त्वरेने पूर्ण करावी. वैद्यकीय शिक्षण विभागाने वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका आणि तंत्रज्ञ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने अभ्यास करून, त्यासाठी पात्रता तपासून अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्येला परवानगी द्यावी, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे
