गणेशभक्तांसाठी पोलीस आणि महापालिकेची विशेष मोहीम
अतिक्रमणमुक्त रस्ते घेणार मोकळा श्वास
गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची शहरातील रस्त्यांवर होणारी गर्दी विचारात घेता त्यांच्या सोयीसाठी रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुणे पोलीस आणि महापालिकेचा अतिक्रमण विभाग यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल केवळ राज्यभरातच नव्हे तर जगभरात उत्सुकता आणि आकर्षण आहे. या काळात गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि सार्वजनिक मंडळांचे आकर्षक देखावे, सजावट, रोषणाई पाहण्यासाठी हजारो पुणेकर रस्त्यावर येतात. त्याचप्रमाणे बाहेरून येणारे भाविक आणि पर्यटक यांची संख्या देखील उल्लेखनीय असते.
या सर्वांना उत्सव काळात अडथळा येऊ नये यासाठी तसेच चेंगराचेंगरी सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यांवर अतिक्रमण करून बसणारे विक्रेते व अन्य संबंधित घटकांना पुणे पोलीस आणि महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसाद न देणाऱ्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करून ते काढून टाकण्यात येत आहे. कारवाई झाल्यानंतर पुन्हा अतिक्रमण रस्त्यावर येऊ नये त्यासाठी ही मोहीम गणेशोत्सव संपेपर्यंत सुरू राहणार आहे, असे पुणे पोलिसांच्या विभाग १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी सांगितले.
