Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

संस्कृत पुन्हा सुप्रतिष्ठित होण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

‘संस्कृत भारती’चे शिरीष भेडसगावकर यांचे प्रतिपादन

पुण्यातील संस्कृतप्रेमी संस्थांकडून संयुक्त साजरा

पुणे   : “संस्कृत ही वैभवसंपन्न भाषा आहे. आपले भारतीय ज्ञानविज्ञान आणि साहित्य संस्कृतमध्ये निबद्ध आहे. अशी संस्कृत भाषा समाजात पुन्हा सुप्रतिष्ठित व्हावी, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे”, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय भगवद्गीता शिक्षण प्रमुख शिरीष भेडसगावकर यांनी बुधवारी येथे केले. “संस्कृत भाषा सर्वसमान्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. संस्कृत दिनाच्या निमित्ताने सर्व संस्कृत संस्थांनी एकत्र येऊन संस्कृतचा सर्वसामान्यांपर्यंत प्रचार – प्रसार करावा”, असे आवाहनही त्यांनी केले.

रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमा हा दिवस देशभर संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून संस्कृत प्रसार व प्रशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्यातील ५० पेक्षा जास्त नामवंत, अग्रगण्य संस्थांच्या वतीने ‘ संयुक्त संस्कृत दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटर मध्ये सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात  भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे निबंधक आणि संस्कृततज्ज्ञ डॉ. श्रीनंद बापट, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. श्याम मुडे, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रसाद जोशी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  त्याचप्रमाणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता. संस्कृत भारती व एमआयटी या संस्थांनी देखील यावेळी अभ्यासपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

भेडसगावकर पुढे म्हणाले, “अनेक अर्थांनी सध्या संस्कृतला अनुकूल असा काळ आहे. नव्या शैक्षणिक धोरणाचा मुख्य आशय शिक्षणातून भारताचा परिचय घडावा, असा आहे. ते शिक्षण प्रामुख्याने संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत संस्कृत भाषेचे महत्त्व पोचणे गरजेचे आहे. समाजात संस्कृत पुन्हा सुप्रतिष्ठित व्हावी, यासाठी एकत्रित प्रयत्नांची ही एक सुरुवात आहे”.

डाॅ. श्रीनंद बापट यांनी ‘पुण्याच्या संस्कृतविद्येचे द्विशतक’ या विषयावर सादरीकरण केले. “१८२१ पासून ते आजपावेतो, संस्कृत भाषेच्या जतन, संवर्धन तसेच प्रचार – प्रसाराचे कार्य अनेक संस्था, त्या उभ्या करणारे संस्कृततज्ञ यांनी केले आहे. हिंदू कॉलेजपासून सुरू झालेला संस्कृत जतनाचा प्रवास अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, मंडळे, प्रतिष्ठान, न्यास आणि वैयक्तिक प्रयत्न…अशा माध्यमांतून प्रवास करत आजपावेतो सुरू आहे”. संस्थात्मक प्रयत्नांच्या जोडीने संस्कृत नियतकालिके, संस्कृत ग्रंथांचे विक्रेते, प्रकाशक, अस्तंगत झालेल्या संस्थांची माहितीही त्यांनी दिली. आधुनिक काळातही अनेक शैक्षणिक संस्था संस्कृत हा विषय शिकवत आहेत. २०२५ मध्ये, पुण्यात संस्कृतसाठी कार्य करणार्या तब्बल ५० पेक्षा अधिक संस्था आजच्या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे संस्कृत वर्धिष्णु होत राहील”, असा विश्वास डाॅ. बापट यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना डाॅ. प्रसाद जोशी म्हणाले, “भारतीय ज्ञान परंपरेविषयी तसेच संस्कृत भाषाविदांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा संस्कृत दिन उपक्रमाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सामूहिक आविष्कार व्हावा, असाही हेतू आहे. सध्याच्या त्रिभाषासूत्र निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, संस्कृत भाषेच्या पाठीशी मजबूत जनसंघटन दिसावे, असाही प्रयत्न आहे”.

भारतीय विद्या भवन संस्थेने पहिलीपासून संस्कृत विषयास प्रारंभ केला असून त्यांच्या पहिलीच्या संस्कृत पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. या उपक्रमाची माहिती डाॅ. लीना मेहेंदळे यांनी दिली. ‘पहिल्या वर्गापासून संस्कृत हा उपक्रम आम्ही प्रयोग म्हणून सुरू केला. आधुनिक विषयांचा आशय संस्कृतमधून विद्यार्थ्यांपर्यंत न्यावा, असा प्रयत्न आहे’, असे डा. मेहेंदळे म्हणाल्या.

मधुकर सिधये यांनी प्रारंभी शंखनाद सादर केला. शंभुनाथ भट्ट यांनी ब्रह्मयज्ञ केला. अंकित रावल यांनी परिचय करून दिला. डाॅ. धनश्री शेजवलकर यांनी आभार मानले. सुवर्णा बोरकर आणि पंकज पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading