Saturday, September 19, 2026
Latest NewsPUNE

गुरु पंडित अजय चक्रवर्ती राज्यातील तरुण, नवोदित कलाकारांना करणार कंठसंगीताचे मार्गदर्शन

पुणे : भारतीय अभिजात संगीत परंपरेत गुरुमुखी विद्येचे महत्त्व अपरंपार मानले जाते. गुरुंच्या समोर बसून, प्रत्यक्ष तालीम घेणे, ही कंठसंगीतातील सर्वोत्तम साधना आहे. मात्र, आधुनिक युगाची गतिमानता, स्थळ आणि वेळाच्या मर्यादा, स्पर्धात्मक वातावरण यांच्या पार्श्वभूमीवर, अभिजात भारतीय कंठसंगीताच्या प्रशिक्षणाची एक आगळीवेगळी संधी कलासाधकांसाठी आता उपलब्ध होणार आहे. श्रुतीनंदन प्रशिक्षण वर्गां अंतर्गत संगीत प्रशिक्षणाची (ट्रेनिंग) स्वतः विकसित केलेली अनोखी शैली, खुद्द त्या शैलीच्या प्रवर्तकांकडूनच शिकण्याचा योग राज्यातील कंठसंगीताच्या विद्यार्थ्यांसाठी जुळून येणार आहे.

विख्यात गायक, गुरू, विचारवंत आणि प्रशिक्षक, पद्मभूषण, पंडित अजय चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची ही संधी आता राज्यातील तरुण, नवोदित कलाकारांना उपलब्ध असून गुरु पं. अजय चक्रवर्ती यांचे हे प्रशिक्षण संपूर्णपणे विनामुल्य असेल याची कृपया नोंद घ्यावी. या उपक्रमासाठी टाटा समूहाचे सहकार्य लाभले आहे हे विशेष.

याविषयी अधिक माहिती देताना गुरु पंडित अजय चक्रवर्ती म्हणाले, “अभिजात भारतीय शास्त्रीय गायनाची साधना करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील निवडक विद्यार्थ्यांमधून यशस्वी, गुणवान व्यावसायिक परफॉर्मर घडवणे, हाच या विशेष प्रशिक्षणाचा उद्देश आहे. महाराष्ट्रात अनेक प्रतिभावंत कलाकार असून मी विकसित केलेल्या विशेष प्रशिक्षणाच्या माध्यमातून, या युवा प्रतिभेला धुमारे फुटतील आणि युवा कलाकार संगीतक्षेत्रात यशस्वी परफॉर्मर म्हणून प्रस्थापित होतील असा मला विश्वास आहे.” श्रुतीनंदन प्रशिक्षण वर्गांमध्ये स्वर, गायकी, लय, ताल, आवाजाचे प्रशिक्षण, आणि तो टिकविण्यासाठी आवश्यक त्या बाबी अशा अनेकविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहितीही पं चक्रवर्ती यांनी दिली.

सदर प्रशिक्षण वर्गांसाठी ८ ते १४ आणि १५ ते २० अशा दोन वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गायनाचा – बंदिश, उपशास्त्रीय रचना, चित्रपटगीत अथवा सुगम संगीतप्रकार यांचा सुमारे ५ ते ७ मिनिटांचा यू ट्यूब अनलिस्टेड व्हिडिओ सोबत दिलेल्या गुगल फाॅर्मवर इतर माहितीसह अपलोड करायचा आहे. ५ सप्टेंबर, २०२५ पर्यंत सदर लिंक अपलोड करण्याची मुदत असून अपलोड झालेल्या लिंक्समधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष सादरीकरणाची ऑडिशन मुंबईमध्ये एनसीपीए (नॅशनल सेंटर फार परफॉर्मिंग आर्ट्स) येथे घेण्यात येईल.

ऑडिशननंतर गुरु पं. अजय चक्रवर्ती हे स्वतः विद्यार्थ्यांची निवड करणार असून यामध्ये निवड झालेल्या कलाकारांना पं अजय चक्रवर्ती यांकडून संगीताचे प्रशिक्षण मिळेल. प्रशिक्षणाचा कालावधी महिन्यातील तीन ते चार दिवस (सकाळी १०.३० ते ५) असून पुणे, मुंबई सोबतच राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी सदर प्रशिक्षण वर्ग संपन्न होणार आहेत. पं अजय चक्रवर्ती यांसोबतच प्रसिद्ध गायक कलाकार असलेले पुण्याचे मेहेर परळीकर आणि आयेशा मुखर्जी हे दोघे या प्रशिक्षण वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना कनिष्ठ गुरु म्हणून मार्गदर्शन करतील. काही अपवादात्मक प्रतिभावान विद्यार्थ्यांना एक किंवा दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

विद्यार्थी कंठसंगीताच्या कोणत्याही घराण्याचे, शैलीचे प्रतिनिधित्व करणारा असला, तरी रियाजाचे काही विशिष्ट मंत्र, तंत्र, सादरीकरणाचे कौशल्य आणि पद्धती, रियाजाच्या काही वेगळ्या पद्धती पं. अजय चक्रवर्ती यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी या उपक्रमातून कलाकारांना मिळेल. गुरु पं. अजय चक्रवर्ती यांनी कंठसंगीताचा रियाज, सादरीकरण यांची एक आगळीवेगळी शैली विकसित केली आहे. या शैलीचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला असून या प्रशिक्षण वर्गांद्वारे कंठसंगीताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रशिक्षण वर्गांची अधिक माहिती खालीलप्रमाणे – https://shorturl.at/YsNpz | Email Id- shrutinandantata@gmail.com | Contact – 9833722408 / 9850683344)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading