नृत्य, गायन आणि वादनाने रंगला ‘दीपक’ कार्यक्रम
शीतल कोलवालकर यांचे वडील दीपक कोलवालकर यांच्या स्मृती जागविण्याच्या उद्देशाने मागील तीन वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात नवोदित व आश्वासक नर्तिका अन्वी श्री यांच्या कथक सादरीकरणाने झाली. गणेश वंदना प्रस्तुतीने त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर झपतालमध्ये थाट, आमद, परण आमद व ततकारचे सादर केले. तीन तालामध्ये गिनती आणि नौहकाची प्रस्तुती त्यांनी केली. ‘कान्हा ऐसो काहे छेडत हो…’ ही अभिनयावर आधारित बंदिश त्यांनी सादर केली. अन्वी श्री यांना वेदांत जोशी (तबला), अमेय बिच्चु (संवादिनी), सुरंजन खंडाळकर (गायन) आणि मुक्ती श्री (पढंत) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाचा समारोप जयपूर अत्रौली घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी यावेळी राग बागेश्रीची दमदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘कौन गत भई…’ ‘जानकी नाथ सहाय करे…’ या बंदिशी प्रस्तुत केल्या. पद्मनाभ नारायणा या अभंगाने त्यांनी समारोप केला. पं. रघुनंदन पणशीकर यांना ऋषिकेश जगताप (तबला), अमेय बिच्चु (संवादिनी), सौरभ काडगांवकर, शुभम खंडाळकर आणि राधिका जोशी यांनी गायन व तानपुरा साथ केली. स्वानंद पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
