अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची निवड
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत सर्व जागांवर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी रोहिणी खडके,निवडणूक अधिकारी तथा निरीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.
याच बैठकीत महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारी संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्ष (कोल्हापूर) धनाजी यमकर, उपाध्यक्ष (मुंबई) आनंद शिंदे, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील आणि सहखजिनदार शरद चव्हाण यांची निवड करण्यात आली.
बैठकीस राज काझी, अजित शिरोळे, सुभाष नकाशे, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर ,रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत समर्थ पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला होता. या निकालानंतर अध्यक्षपदासाठी मेघराज राजेभोसले यांचे नाव पुढे आले आणि संचालक मंडळातील सदस्यांनी त्यांच्यावर एकमताने विश्वास व्यक्त केला.
निवडीनंतर बोलताना मेघराज राजेभोसले यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध घटकांना एकत्र घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध प्रश्न सोडविणे, उद्योगाला चालना देणे, नवोदित कलाकार व तंत्रज्ञांना संधी उपलब्ध करून देणे तसेच चित्रपट, दूरदर्शन, नाट्य आणि ओटीटी क्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
मराठी मनोरंजन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त करताना त्यांनी सदस्यांच्या विश्वासाबद्दल आभार मानले. आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांना सोबत घेऊन उद्योगाच्या प्रगतीसाठी, कलाकार-तंत्रज्ञांच्या हितासाठी आणि मराठी चित्रपटांच्या व्यापक प्रसारासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
