फ्रँचायझी क्रिकेटमुळे राज्य पातळीवरील मुलींना वेगळ्या प्रकारचा व्यावसायिक अनुभव मिळतो – स्मृती मंधाना
महाराष्ट्र विमेन्स प्रीमियर लीगच्या (WMPL) पहिल्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जेट्स संघाची कर्णधार आणि आयकॉन खेळाडू स्मृती मंधानाने आपले विचार मांडले. महिलांच्या टी-२० लीग्समधील वाढ, फ्रँचायझी क्रिकेटचा महिलांच्या खेळावर होणारा वाढता प्रभाव, WMPL मध्ये प्रेरणास्रोत म्हणून तिची भूमिका आणि तळागाळात उत्तम कार्यक्रमांची आवश्यकता तिने अधोरेखित केली.
स्मृती मंधानाने महाराष्ट्रातील महिला टी–२० लीग्सच्या वाढत्या प्रवाहाचे कौतुक करताना सांगितले की, अशा व्यासपीठांमुळे राष्ट्रीय संघासाठी आवश्यक प्रतिभा ओळखणे सुलभ होते. ती म्हणाली:
“राज्य संघटनांसाठी आणि महाराष्ट्रासाठीही अशा प्रकारचे व्यासपीठ असणे महत्त्वाचे आहे. इथे WPL स्काउट्सची नजर असेल आणि या स्पर्धांतील कामगिरी ही राज्य संघात निवड होण्यासाठी एक मानक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या संधी उपलब्ध होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, मला नेहमीच असं वाटतं की, फ्रँचायझी क्रिकेट हे खेळात एक वेगळ्या प्रकारचं व्यावसायिकतेचं वातावरण आणते. राज्य पातळीवरील मुलींना ते अनुभवायला मिळणं हे खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जेव्हा त्या पुढच्या स्तरावर जातील, तेव्हा त्या अधिक चांगल्या प्रकारे तयार असतील. मालकांकडून विशिष्ट अपेक्षा असतात आणि अशा अपेक्षांमध्ये खेळणं म्हणजे खेळाडूंचं प्रशिक्षण व मानसिक परिपक्वता वाढविणं. त्यामुळे मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील अनेक मुलींना याचा मोठा फायदा होणार आहे.”
स्मृती मंधानाने रत्नागिरी जेट्स आणि जेट्स क्लबसोबतच्या तिच्या जोडल्या जाण्याबाबत व तरुण महिला खेळाडूंना दीर्घकालीन प्रगतीसाठी योग्य दिशा देणाऱ्या रचनात्मक कार्यक्रमांत महिलांच्या दृष्टिकोनाचे महत्त्व यावरही विचार व्यक्त केले. ती म्हणाली:
“१४ – १५ वयातच योग्य मार्गदर्शन आणि अनुकूल वातावरण मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. अर्थात, आम्हाला ते थोडं उशिरा मिळालं, त्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू पाहूनच स्वतःमध्ये ते विकसित करावं लागलं, पण सध्या भारतातल्या महिला क्रिकेटमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात होणारी गुंतवणूक, जी खेळाडूंना घडविण्यासाठी होते. आमच्या कारकिर्दीत उशिरा जाऊनच आम्हाला फिटनेस आणि अशा गोष्टींचं महत्त्व समजलं, पण मला खात्री आहे की, जेट्स क्लबच्या उपक्रमामुळे खेळाडूंना पुढच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी काय आवश्यक आहे, याची जाणीव होईल आणि ते त्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयार होतील. अशा क्लब्स आणि संस्थांचा क्रिकेटमध्ये प्रवेश, पुरुष क्रिकेटमध्ये ही बाब आधीपासूनच होती, पण आता जेव्हा हे महिला क्रिकेटमध्ये होत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की, अनेक मुलींना याचा फायदा होणार आहे. या माध्यमातून प्रभावित होणाऱ्या मुलींची संख्या खूप मोठी असेल आणि मला खात्री आहे की, पुढील ३–४ वर्षांत भारतीय महिला संघात व त्यांच्या कामगिरीत स्पष्ट बदल दिसून येईल.”
रत्नागिरी जेट्सच्या कर्णधार म्हणून बोलताना स्मृती मंधानाने कॉर्पोरेट पाठबळ असलेल्या लीग्स महिला क्रिकेटसाठी कशा उपयोगी ठरतात, यावरही प्रकाश टाकला. ती म्हणाली:
“महिला क्रिकेटसाठी असं व्यासपीठ असणं हे खूपच विलक्षण आहे. राज्य संघटना आणि WPL ज्या पद्धतीने याला पाठिंबा देत आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, महिला क्रिकेटही उत्पन्न निर्माण करू शकते, ही गोष्ट खरोखरच स्तुत्य आहे. लोक यात गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत. खेळ जितका व्यावसायिक होतो, तितका तो अधिक चांगला होत जातो, विशेषतः गट स्तरावरच्या क्रिकेटपटूंकरिता. त्यांच्यासाठी हे सर्वकाही फारच उत्तम आहे. माझ्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर प्रचार हे एक पाऊल आहेच, पण आता महिला क्रिकेट त्या टप्प्याच्या पुढे गेले आहे. आज गुंतवणूकदार तयार आहेत, यातून हेच दिसते की, महिला क्रिकेट वाढत आहे आणि प्रेक्षक ते बघत आहेत, त्यात रस दाखवत आहेत.”
स्मृती मंधानाला जेव्हा पहिल्या WMPL (विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग) हंगामात विजेतेपद जिंकण्याच्या संधीबद्दल आणि त्यासोबत येणाऱ्या अपेक्षांबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली:
“जेव्हा मी पहिल्यांदा रत्नागिरी जेट्ससोबत संवाद साधला, तेव्हा ओळखीनंतर त्यांनी सांगितलं की, त्यांनी पहिल्या दोन हंगामांत विजेतेपद पटकावलं आहे, तेव्हा मी म्हणाले, ‘अरे व्वा, ठीक आहे, पण मी त्याला ताण म्हणून पाहत नाही. कारण ज्या संघाने आधीच विजय मिळविला आहे आणि देविका मॅडम म्हणाल्याप्रमाणे, त्या MPL चा भाग राहिल्या आहेत, त्यांना फ्रँचायझी क्रिकेट, विशेषतः राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये काय आवश्यक आहे, याची जाणीव आहे. ही जाणीव असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती नक्कीच फायद्याची ठरणार आहे. मी याला ताण म्हणून पाहत नाही. कारण मैदानात प्रत्येक वेळी उतरतानाच एक नैसर्गिक दबाव असतोच, त्यात वेगळा ताण घेण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या संघासाठी जर्सी परिधान करता, तेव्हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम खेळ करण्याची इच्छा ही आधीपासूनच असते. त्यामुळे ते प्रेशर असतेच, पण आम्ही त्याला दबाव न समजता प्रेरणा म्हणून घेणार आहोत.”
स्मृती मंधानाने संघाचे नेतृत्व करताना आपल्या भूमिकेबाबत आणि संघासाठीच्या संदेशाबाबत बोलताना सांगितले:
“सर्वप्रथम, मी संपूर्ण संघासोबत एक चांगला संवाद साधेन आणि माझा एकच संदेश असेल, जो मी स्वतः मानते, क्रिकेट मजेसाठी, आनंद घेण्यासाठी आणि एक सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी खेळा. कारण तुम्ही ट्रॉफी जिंकता किंवा जिंकत नाही, पण शेवटी लक्षात काय राहतं, तर त्या एका महिन्याचा किंवा २० दिवसांचा प्रवास, जेव्हा आपण सर्वजण एका संघाचा भाग असतो. म्हणूनच मला वाटतं, आपण हे सर्व खूप मजेशीर आणि सकारात्मक बनवायला हवं. मला ‘सीनियर-ज्युनियर’ या भानगडीत फारसा विश्वास नाही. माझ्या मते, फक्त अनुभव अधिक किंवा कमी असतो. मी जिथून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, म्हणजे महाराष्ट्रातून आजही संधी मिळाली की, मी खेळतेच, पण जेव्हा मला कळलं की, महाराष्ट्र महिलांसाठी एक स्वतंत्र लीग सुरू करत आहे, तेव्हा मला खूप आनंद आणि उत्साह वाटला. जेव्हा एखाद्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, तेव्हा ती नेहमीच नवीन आणि रोमांचक भूमिका असते. त्यामुळे मला नक्कीच खूप आनंद झाला, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्रातल्या मुलींना हे व्यासपीठ मिळणार आहे आणि त्यांना स्वतःला व्यक्त करता येणार आहे, ही गोष्ट खूप प्रेरणादायक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रवासाची मी आतुरतेने वाट पाहते आहे.”
स्मृती मंधानाने मार्गदर्शनाची भूमिका पार पाडताना तरुण खेळाडूंना स्वतंत्रपणे घडू देण्याच्या संतुलनाबाबत आपले विचार व्यक्त करताना सांगितले:
“माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे, पण आम्हाला थोडासा अनुभव WPL च्या पहिल्या वर्षी मिळाला होता. आम्ही त्या काळात खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे स्थानिक क्रिकेट फारसं खेळता आलं नव्हतं, पण अचानक WPL मध्ये काही अनकॅप्ड (नवोदित) खेळाडू आमच्यासोबत खेळायला आले, तेव्हा त्यांच्यासोबत संवाद साधणं गरजेचं ठरलं. माझ्या मते, हा अनुभव आमच्यासाठीही खूपच सुंदर ठरला. ही प्रक्रिया एकतर्फी नाहीये. अनेकदा जेव्हा तुम्ही खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून परतता आणि या मुलींची ऊर्जा पाहता, तेव्हा ती ऊर्जा तुम्हीही स्वतःमध्ये शोषून घेता. हे दोन्ही बाजूंनी चालतं. आम्ही त्यांच्याकडूनही खूप काही शिकतो आणि अर्थातच, त्या आमच्याकडूनही शिकतात. त्यामुळे जर हे द्विमार्गी ठेवलं, तर ते संतुलित होतं व ‘आपल्यालाच सतत देत राहावं लागेल’ अशा विचारात अडकत नाही.”
शेवटी, स्मृती मंधानाने WMPL लीगच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला. ती म्हणाली:
“ही WMPL ची पहिलीच आवृत्ती आहे, त्यामुळे मला खात्री आहे की, यावेळी बरेच नवीन चाहते तयार होतील. आम्ही पूर्वी पुण्यात WT20 चॅलेंजमध्ये खेळलो आहोत आणि तिथे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मला अपेक्षा आहे की, यावेळीही प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील व महिला क्रिकेटला, तसेच रत्नागिरी जेट्स संघाला भरभरून पाठिंबा देतील. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत महाराष्ट्रासाठी खेळले आहे, त्यामुळे पुण्यात परत येणं आणि WMPL मध्ये खेळणं, हे माझ्यासाठी खूपच आनंददायक व रोमांचक आहे. मला आशा आहे की, क्रिकेट चाहते मोठ्या उत्साहाने येतील, आम्हाला पाठिंबा देतील आणि आमचा खेळ पाहून आनंदी होतील.”
