Wednesday, May 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

डॉ. प्रमोद चौधरी यांनी इथेनॉलच्या क्षेत्रात केलेले काम म्हणजे एका कल्पक उद्योजकाने केलेली देशसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘पैलतीरावरून …. तर अस झालं’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे  : आतापर्यंत इथेनॉलच्या क्षेत्रात डॉ. प्रमोद चौधरी यांनी केलेले काम म्हणजे एका कल्पक उद्योजकाने केलेली देशसेवा असून त्यांचे यामधील योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. भारताचे इथॅनॉल मॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ उद्योजक व प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘पैलतीरावरून …. तर अस झालं’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावळी ते बोलत होते.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, पुस्तकाचे प्रकाशक आणि विश्वकर्मा प्रकाशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी,  प्राजच्या बायोएनर्जी बिझनेसचे अध्यक्ष अतुल मुळे  आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना इथेनॉल ब्लेंडिंगचे प्रमाण वाढविण्याच्या विषयाला सुरवात झाली होती. तेव्हा याविषयी संशोधन करण्यासाठी एक अभ्यासगट ब्राझीलमध्ये गेला होता. त्यांनी सादर केलेला अहवाल मंजूर होऊन याविषय धोरण देखील येणार होते. पण काही काळामध्ये वाजपेयी सरकार गेले. यानंतर इथेनॉलचा वापर वाढला तर देशात अन्न  सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा चर्चा सुरु झाल्या आणि हा विषय मागे पडत, इथेनॉल मिशनला उशीर झाला असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार २०१४ मध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर इथेनॉल च्या विषयाला पुन्हा एकदा गती मिळाली. कोणत्याही योजनेचे धोरण तयार झाले तरी त्याची अंमलबजावणी होणे कठीण असते. इथेनॉलच्या बाबत तयार झालेल्या धोरणाचे पुनरावलोकन करून डॉ. प्रमोद चौधरी यांनी काही सूचना केल्या होत्या. सरकारने त्याचा समावेश धोरणामध्ये केला आणि २०१७-१८ पासून त्याचा वेग वाढला. सध्या भारतामध्ये या क्षेत्रात वेगाने प्रगती होत असून त्यामध्ये सर्वात मोठे योगदान हे डॉ. चौधरी यांचे आहे.” पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण हे २० टक्यापर्यंत गेल्यामुळे एक लाख कोटीपेक्षा अधिक परकीय चलनाची बचत होत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

गेल्या दहा वर्षांपासून आम्ही साखर कारखान्याचे प्रश्न सोडवत आहोत. मात्र, साखर कारखान्यांना मोलाची साथ देण्यामध्ये प्राजचे योगदान मोठे आहे. विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामध्ये इथेनॉलचा वापर सुरु झाला आहे. भविष्यकाळात विमान आणि अन्य वाहने ही जैव इंधनावर चालतील. सध्या या क्षेत्रात होत असणाऱ्या क्रांतीचा विचार केला तर तो दिवस दूर नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

प्लास्टिकचे संकट मोठे असून त्यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. सध्याचे प्लास्टिक हे बायोडिग्रीएबल कसे करता येईल, याविषयीचे धोरण तयार झाले तर त्यामधून त्यावर आधारित उद्योगाच्या उभारणीला चालना मिळू शकते, असे फडणवीस  यांनी नमूद केले.

गडचिरोलीमधील कृषी कचरा, धान कचरा आणि महुआच्या फुलांचा कचरा यांचा पुनर्वापर करीत कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प करण्या विषयीचा अहवाल डॉ. प्रमोद चौधरी यांनी तयार केला आहे. सध्या राज्यात वेगाने बदलणारा पहिला जिल्हा म्हणून त्याच्याकडे पहिले जात आहे. डॉ. चौधरी यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्याचे धोरण तयार करू, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

काळाच्या पुढे पाहणारे उद्योजक असा लौकिक असणारे डॉ. प्रमोद चौधरी यांनी नावीन्य, कल्पकता, संशोधन आणि सकारात्मकता या चार गुणांच्या जोरावर विकास केला. आपल्या प्रतिभा आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले. त्यांनी लिहिलेले पुस्तक हे तरुण पिढीच्याबरोबरच नव्या उदयॊजकांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रा. मिलिंद जोशी यावेळी म्हणाले.

सध्या इथेनॉलच्या क्षेत्रात होणारी प्रगती चांगली आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के त्याचे मिश्रण केले जाते, भविष्यकाळात हे प्रमाण ३० ते ४० टक्यांपर्यंत जाईल. आपण लिहिलेले हे पुस्तक आत्मकथन नसून या क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव व घडामोडी सोप्या शब्दात सांगितल्या असल्याचे डॉ. चौधरी म्हणाले. विशाल सोनी यांनी प्रकाशकाचे प्रास्ताविक केले, मंजिरी धामणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अतुल मुळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading