Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

अक्षय शहापूरकर, क्षितिजा आगाशे, विनोद आढाव यांना यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार

पुणे : श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार अक्षय शहापूरकर, क्षितिजा आगाशे, विनोद आढाव यांना प्रदान करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अनघा दिवाणजी, केंद्राचे सहाय्यक सहकारी सारिका पाटणकर, अपेक्षा राऊत, समृद्धी जाजू, संदीप लचके, सारंग सराफ, प्रिती नायकवडी, सौरभ पुंडे हे उपस्थित राहणार आहेत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार क्रीडापटू व शास्त्रीय नृत्यांगना गायत्री शेजवलकर आणि बाल गौरव पुरस्कार साहसी क्रीडा खेळाडू शिवांश कर्डे व निष्ठा जाबरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर आणि आमदार हेमंत रासने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच स्वरदा बापट, मिलिंद एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती आणि अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.मिलिंद भोई, शिरीष मोहिते, योगेश समेळ, पीयुष शहा, संदीप लचके, सीमा सरदेशपांडे, कल्पना जाधव, हेमंत मावळे, आनंद सराफ, प्रल्हाद गवळी, नितीन पंडित आदींची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे.

अनिल दिवाणजी म्हणाले, कसबा गौरव पुरस्काराचे मानकरी अक्षय शहापूरकर हे प्रख्यात रंगावलीकार असून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे. तर, क्षितिजा आगाशे या नाट्य लेखन, दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. तसेच, विनोद आढाव हे शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देत असून अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.

अनघा दिवाणजी म्हणाल्या, संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याकरिता गौरविण्यात येते. यावर्षी देखील पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आणि सुसंस्कारसंपन्न भावी पिढी निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बालसंस्कार केंद्र चालविण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading