ढोल ताशा पथकांमुळे सण-उत्सवांना विधायक स्वरूप प्राप्त झाले – मुरलीधर मोहोळ
पुणे : पूर्वी काही वर्षांपूर्वी मोठमोठ्या साऊंडच्या भिंती उभ्या करून, बीभत्स पद्धतीने डान्स करत सण-उत्सव साजरे केले जात होते. त्यामुळे आपले सण आपण कसे साजरे करायचे हे आपण विसरत चाललो होतो, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर ढोलताशा पथकांची संख्या वाढत गेली आणि सण-उत्सवांना पुन्हा धार्मिक आणि विधायक स्वरूप प्राप्त झाले, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
ढोलताशा महासंघ महाराष्ट्र यांच्यावतीने राज्यभरातील ढोलताशा पथकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन बीएमसीसी कॉलेज ऑफ कॉमर्स येथील टाटा हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सुभाष लाडे, संजय सातपुते, अभिनेता सौरभ गोखले, राजाभाऊ कदम, मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती सार्वजनिक ट्रस्ट चे कार्याध्यक्ष निलेश वकील आदी उपस्थित होते.
या अधिवेशनात नागपूर, नाशिक, मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा २० जिल्ह्यांतील सुमारे २५० पथकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महासंघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन मोहोळ यांना देण्यात आले.
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, मी मंत्री झालो असलो तरी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. आज ढोलताशा पथकांद्वारे जगभर मराठी माणसाने ही वैभवशाली परंपरा पोहोचवली आहे. यासोबतच लेझीम, लाठी-काठी यांसारख्या ग्रामीण परंपराही या पथकांमध्ये सामावून घेतल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
पराग ठाकूर म्हणाले, ढोलताशा पथक हे सरकारचे नाक, कान आणि डोळे होऊ शकतात. वेगवेगळ्या माध्यमांतून ते सरकारला सहकार्य करू शकतात. ढोल ताशा वादनाला ‘खेळ’ म्हणून मान्यता मिळावी. तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांची सुरुवात ढोलताशा वादनाने व्हावी, सरकारी कार्यक्रमांमध्येही हे वादन व्हावे. अशा विविध मागण्या सरकरा मान्य करेल अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. या अधिवेशनामुळे पथकांची संघटित ताकद निर्माण होईल. भक्तीचा संगम असलेल्या ताकदीचा उपयोग समाजासाठी होतो; ती विनाशक ठरत नाही, तर लोकांना सहायक ठरते, असेही ठाकूर यांनी सांगितले. सूत्रसंचालन अॅड. शिरीष थिटे यांनी केले.
